वॉशिंग्टन ः समुद्रांची दुनिया रहस्यमय आहे. तिथे कशा स्वरूपाचे जीव आढळतील हे सांगता येत नाही. आता संशोधकांना खोल समुद्रात एक विचित्र जीव आढळून आला आहे. त्याचे तोंड हुबेहूब 'स्टार वॉर्स' चित्रपटातील खलनायकासारखे आहे. त्यामुळे या जीवाला संशोधकांनी त्याचेच 'डार्थ वेडर' असे नाव दिले आहे.
या खलनायकाचे हेल्मेट आणि चेहरा या जीवासारखाच आहे. त्याचे डोळे संयुक्त प्रकारचे आहेत तर शरीर सहा खंडांचे आहे. अँटेनासारख्या दोन आकृती व चार जबडे आहेत. खोल समुद्रात असल्याने ते आकाराने तुलनेने मोठे आहेत. ते सुमारे 30 सेंटीमीटरपेक्षाही मोठ्या आकाराचे असू शकतील असे संशोधकांना वाटते. समुद्रात 950 ते 1260 मीटर खोलीवर हे जीव आढळून येतात. या आयसोपॉडचे वैज्ञानिक नाव 'बाथिनोमस युकाटेनेंसिस' असे आहे. मेक्सिकोच्या खाडीत हा जीव सर्वप्रथम सापडला होता. या जीवाची त्वचा कठीण आणि हलक्या पिवळ्या रंगाची असते. त्याच्या सुमारे 20 प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. झिंगे, खेकडे यांचा हा जीव नातेवाईकच आहे.