पाण्यात चक्क माशांच्या झुंडीची ‘वावटळ’! | पुढारी

पाण्यात चक्क माशांच्या झुंडीची ‘वावटळ’!

लंडन ः जमिनीवर उंच उडणारी वावटळ अनेकांनी पाहिली असेल. मात्र, पाण्यात माशांच्या समूहाने तयार केलेला वावटळीसारखा आकार पाहणे ही एक रंजक बाब आहे. त्याचा एक व्हिडीओ आता समोर आला असून अनेक लोक थक्क होऊन हा प्रकार पाहत आहेत. आकाशात स्टरलिंग पक्ष्यांचा थवा जसे वेगवेगळे आकार घेत उडत असतो तसाच प्रकार काही लहान मासे करीत असतात. अशा माशांचा हा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की लहान आकाराचे हे मासे एकत्र येऊन पाण्याखाली एखाद्या वावटळीप्रमाणे घोंघावत आहेत. पाण्यात भोवरा तयार करून गोल गोल फिरणार्‍या या माशांचा व्हिडीओ अनेकांना थक्क करीत आहे. हे मासे एकाच दिशेने वावटळीसारखे गोल भोवरा निर्माण करीत असताना यामध्ये दिसते. हा भोवरा अरुंद, दोरीप्रमाणे पिळदार दिसतो. इन्स्टाग्रामवर जपानमधील एका व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला 3.6 दशलक्षांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. 2.4 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. अनेक लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Back to top button