हवामान बदलामुळे वाढू शकतो मृत्यू दर | पुढारी

हवामान बदलामुळे वाढू शकतो मृत्यू दर

बीजिंग ः चालू शतकाच्या अखेरपर्यंत जगभरातील तापमानात सहापटीने वाढ होईल. हवामान बदल, तापमानवाढीमुळे मृत्यू दरात वाढ होऊ शकते असे संशोधकांनी म्हटले आहे. ‘लँसेट प्लॅनेटरी हेल्थ’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी म्हटले आहे की भविष्यात हवामान बदलामुळे रात्रीच्या वेळीही तापमानात व्यापक वाढ होईल व त्याचा परिणाम लोकांच्या झोपेवरही होऊ शकतो. कमी झोपेमुळे माणसाची रोगप्रतिकारक क्षमता कमी होईल व त्यामुळे हृदयविकार, जुनाट रोग, सूज व मानसिक अनारोग्य अशा समस्या वाढतील. संशोधकांना आढळले की 2090 सालापर्यंत पूर्व आशियातील 28 शहरांमध्ये रात्रीच्या वेळी तापमानात वाढ होण्याच्या तीव—तेत 20.4 अंश सेल्सिअसवरून वाढ होऊन ते 39.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. सामान्य झोपेत व्यत्यय आणणार्‍या या अत्याधिक तापमानवाढीमुळे, उकाड्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढेल. संशोधनात सहभागी झालेले एक चिनी वैज्ञानिक यूकियांग चांग यांनी सांगितले की चीन, दक्षिण कोरिया आणि जपानच्या 28 शहरांमध्ये 1980 ते 2015 पर्यंत अधिक तापमानामुळे होणार्‍या मृत्यूंचे विश्लेषण करून हवामान बदलाच्या दोन मॉडेलच्या आधारे हे आकलन करण्यात आले आहे. त्याआधारे असा निष्कर्ष निघाला की वाढलेल्या उष्णतेने मृत्यू दरातही मोठी वाढ होऊ शकते.

Back to top button