ज्येष्ठमधात असतात अनेक औषधी गुण | पुढारी

ज्येष्ठमधात असतात अनेक औषधी गुण

नवी दिल्‍ली : ज्येष्ठ मधाच्या काड्या अतिशय गोड चवीच्या असतात व त्यामुळेच त्याला ‘मधा’ची उपमा दिली जाते. मात्र, केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही ज्येष्ठमध गुणकारी आहे. सर्दी-खोकल्यात अनेक लोक ज्येष्ठमध घेत असतात; पण त्याशिवायही त्याचे अनेक उपयोग आहेत. ज्येष्ठमधाला हिंदीत ‘मुलेठी’ असे म्हणतात. या मुलेठी किंवा ज्येष्ठमधात व्हिटॅमिन ए, ई, प्रोटिन, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंटस् असतात.

तसेच अँटिबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणही ज्येष्ठमधात असतात. त्यामुळे सर्दी-खोकला दूर करण्यासाठी ज्येष्ठमध गुणकारी ठरतो. ज्येष्ठमध घालून चहाही पिला जातो. ज्येष्ठ मधाचे सेवन आपल्या पोटासाठीही लाभदायक असते. ज्येष्ठमधातील ग्लिसरायजिक पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अल्सरसारख्या पोटाच्या समस्यांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे. तसेच संधीवातावरही ज्येष्ठमध गुणकारी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ज्येष्ठमधातील अँटिऑक्सिडंट व अँटिबायोटिक गुण यावर लाभदायक ठरतात. वेदना व सूज दूर करण्यासाठी ज्येष्ठमध परिणामकारक ठरते.

Back to top button