जमिनीत अचानक पडला विशाल खड्डा | पुढारी

जमिनीत अचानक पडला विशाल खड्डा

सँतियागो: चिलीची राजधानी सँतियागोपासून सुमारे 650 किलोमीटर अंतरावर शनिवारी अचानकपणे एक विशाल खड्डा पडला. या ‘जायंट सिंकहोल’ची खोली 650 फूट (200 मीटर) असून रुंदी 82 फूट (25 मीटर) आहे. या खड्ड्याचा संबंध तांब्याच्या खाणीशी जोडून पाहिला जात आहे. आता तिथे चिलीच्या अधिकार्‍यांनी तपास सुरू केला आहे.

चिलीच्या उत्तरेकडील टिएरा अमरिला टाऊन या कोपियापो प्रांतातील शहरात हा खड्डा अचानकपणे निर्माण झाला. तो ज्याठिकाणी बनला ते ठिकाण ‘लंदिन मायनिंग’ या कॅनडाच्या कंपनीच्या ताब्यात आहे. या खड्ड्याजवळच विशाल ‘अलकपरोसा’ नावाची खाण आहे. ‘लंदिन मायनिंग’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की या खड्ड्यामुळे मनुष्यहानी झालेली नाही. ‘लंदिन मायनिंग’ ही कंपनी येथील 80 टक्के जमिनीची मालक आहे.

अन्य जमीन जपानच्या सुमितोमो कॉर्पोरेशनकडे आहे. ‘शनल सर्व्हिस ऑफ जियोलॉजी अँड मायनिंग’चे संचालक डेव्हीड मोंटेनीग्रो यांनी म्हटले आहे की तज्ज्ञ अधिकार्‍यांना याठिकाणी पाठवण्यात आले आहे. या खड्ड्याच्या पोकळीत कोणती विशेष सामग्री मिळालेली नाही; पण खड्ड्यात पाणी आहे. हा खड्डा कशामुळे बनला याची अधिकृत माहिती समजलेली नाही. हा खड्डा अद्यापही वाढत असल्याचे स्थानिक अधिकार्‍यांनी म्हटले आहे. या खड्ड्यापासून सर्वात जवळचे घर 600 मीटरच्या अंतरावर आहे.

Back to top button