डायनासोरच्या सर्वाधिक पाऊलखुणा ‘या’ गावात! | पुढारी

डायनासोरच्या सर्वाधिक पाऊलखुणा ‘या’ गावात!

न्यूयॉर्क: जगाच्या पाठीवर काही ठिकाणी डायनासोरच्या पाऊलखुणा म्हणजेच पावलांचे ठसेही आढळलेले आहेत. उत्तर चिलीमधील हुआटाकोंडोच्या तारापाका नावाच्या गावात तर डायनासोरच्या सर्वाधिक पाऊलखुणा आढळलेल्या आहेत. या गावात डायनासोरच्या एक हजारपेक्षाही अधिक पाऊलखुणा आढळल्या आहेत.

चिलीमधील व अन्य देशांमधील काही संशोधकांच्या पथकाने या पाऊलखुणा शोधून काढल्या आहेत. त्यांनी 23 मे ते 3 जून या काळात उत्तर चिलीच्या तारापाका परिसरात या खुणा शोधून काढल्या. 30 चौरस किलोमीटरच्या परिसरात त्यांना एक हजारपेक्षाही अधिक पाऊलखुणा आढळून आल्या. या संशोधकांमध्ये चिलीची राजधानी सँतियागोमधील एक खासगी विद्यापीठातील ख्रिश्‍चियन सालाजार यांचाही समावेश आहे. त्यांनी सांगितले की, दहा दिवसांच्या काळात आम्हाला एक हजारपेक्षाही अधिक डायनासोरच्या पाऊलखुणा आढळल्या. त्यामध्ये तरुण, प्रौढ आणि वयस्कर थेरोपॉड आणि सॉरोपॉड डायनासोरच्या पाऊलखुणांचा समावेश आहे. हे डायनासोर 150 दशलक्ष वर्षांपूर्वी वावरत होते. या पावलांचा आकार 80 सेंटीमीटर ते एक मीटरपर्यंतचा आहे. हे विशाल प्राणी 12 मीटर लांबीचे असावेत, असे त्यावरून दिसून येते.

संबंधित बातम्या
Back to top button