

रोम : इटलीमधील सॅन जुलियानो परिसरात पुरातत्त्वतज्ज्ञांना 2,600 वर्षांपूर्वीची एट्रस्कन थडगे अखंड व सुस्थितीत आढळले आहे. अनेक शतके सुरू असलेल्या दफनभूमीतील लुटालुटीच्या काळातही हे थडगे कुणीही उघडले नव्हते. त्यामुळे आत मिळालेली साधने, भांडी आणि मानवी अवशेष जवळपास मूळ स्वरूपात सापडले.
याठिकाणी शिळेत कोरलेल्या दगडी खाटांवर चार जणांचे सांगाडे ठेवलेले होते. त्यांच्या भोवती शंभरहून अधिक वस्तू मातीची भांडी, शस्त्र, कांस्याचे अलंकार, अगदी चांदी गुंडाळण्यासाठी वापरले जाणारे छोटे स्पूल्स सापडले. यामध्ये तब्बल 74 भांडी अखंड अवस्थेत असल्याची नोंद झाली आहे. ही मोहीम अमेरिकेतील बायलर युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डेविडे झोरी यांच्या नेतृत्वाखाली सॅन जुलियानो आर्कियॉलॉजिकल रिसर्च प्रोजेक्ट ( SGARP) आणि इटालियन वारसा विभाग यांच्या सहकार्याने पार पडली. बहुतेक थडगी पूर्वीच लुटल्या गेल्या असल्यामुळे वस्तू आणि सांगाडे कुठे व कसे ठेवले होते याचा संदर्भ मिळत नाही; पण हे थडगे पूर्णपणे सीलबंद असल्याने वस्तूंचा नेमका संदर्भ जपला गेला आहे.
रोमन साम—ाज्य उभारण्यापूर्वी मध्य इटलीत एट्रस्कन लोकांची समृद्ध संस्कृती फुलली होती. त्यांची घरासारखी दिसणारी समाधी, शिळांवर कोरलेले खाट व सजावट हे त्यांच्या दफनसंस्कृतीचे वैशिष्ट्य होते. समाधींमध्ये अन्नपदार्थ ठेवण्यासाठी भांडी, शस्त्रे, अलंकार, दैनंदिन वापराच्या वस्तू अशा अनेक गोष्टी ठेवण्याची प्रथा होती. त्यामुळे त्या काळातील आहार, व्यापार आणि सामाजिक स्थान याबाबत माहिती मिळते. संशोधकांनी प्रत्येक वस्तू व हाडे हलवण्याआधी त्याचे छायाचित्रण, मॅपिंग व नोंद करून ठेवली.
सांगाड्यांवरून वय, लिंग, आरोग्य व रोगांचा अभ्यास होणार आहे. दात व हाडांवरून आहार व स्थलांतराची माहिती मिळेल. मातीची भांडी व धातूंचे विश्लेषण करून त्यांचा वापर व व्यापारमार्ग ओळखले जातील. या उत्खननात विद्यार्थ्यांबरोबर स्थानिक लोकांनीही सहभाग घेतला. वस्तू स्वच्छ करणे, नोंदणी करणे या टप्प्यांमध्ये सर्वांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. त्यामुळे संशोधन पारदर्शक राहिले आणि वारसा जपण्याबाबत जनजागृतीही झाली. सॅन जुलियानोतील ही समाधी एट्रस्कन इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. अखंड स्वरूपात सापडलेले सांगाडे आणि वस्तू भविष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करतील.