

कॅलिफोर्निया : जिवंत राहण्यासाठी माणसाला जशी अन्नाची गरज असते, तशी गरज झाडे आणि वनस्पतींनाही असते. वनस्पती आपले अन्न सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार करतात. याचा अर्थ असा होतो की, माणसाबरोबरच झाडे, वनस्पतींचे जीवनही सूर्यप्रकाशावरच अवलंबून असते. म्हणजे जगातील खाद्याचे उत्पादन प्रामुख्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर अवलंबून आहे. मात्र, जगात सध्या अशी अनेक संशोधने करण्यात येत आहेत की, जेणेकरून अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींचे सूर्यप्रकाशावर अवलंबून असणे संपुष्टात आणले जाईल. तसेच कृत्रिम प्रकाश संश्लेषणाच्या आधारे अन्नाचे उत्पादन केले जाईल.
कृत्रिम प्रकाश संश्लेषणाचा प्रयोग भविष्यात मंगळावर फारच उपयोगी पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या कोट्यवधी वर्षांपासून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या मदतीने झाडे पाणी आणि कार्बन डाय ऑक्साईडचे अन्नात रूपांतर करत आहेत. दरम्यान, रिवरसाईड येथील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ डेलावरेच्या संशोधकांनी सूर्यप्रकाशापासून मुक्त कृत्रिम प्रकाश संश्लेषणाची अशी एक पद्धत विकसित केली आहे की, जी जैविक प्रकाश संश्लेषणाशिवाय वनस्पती आपले अन्न तयार करू शकतील. संशोधकांच्या मते, नव्या पद्धतीने जैविक प्रकाश संश्लेषणावरील अवलंबित्न संपुष्टात आणले जाऊ शकते. नव्या पद्धतीच्या मदतीने रात्रीच्या सुमारासही झाडे आपले अन्न तयार करू शकतील.