

चेन्नई : सुमारे 2,500 वर्षांपूर्वी दक्षिण भारतात राहणार्या दोन व्यक्तींना डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा ‘जिवंत’ करण्यात आले आहे. त्यांच्या अवशेषांवरील संशोधनातून त्यांचे चेहरे कसे दिसत असावेत याबाबतचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे.
मदुराई कामराज विद्यापीठाच्या जनुकीय विभागाचे (Department of Genetics) प्रमुख कुमारेसन गणेशन यांनी सांगितले की, दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यात असलेल्या कोंडगाई या दफनभूमीत सापडलेल्या दोन कवटींवरून हे चेहर्याचे मॉडेल तयार करण्यात आले आहेत. संशोधकांना कोंडगाई हे जवळच्या किळदी या पुरातत्व स्थळातील दफनभूमी असावी, असे वाटते. संशोधकांच्या मते, किळदीमध्ये इ.स. सन पूर्व 580 च्या आसपास एक प्रगत शहरी संस्कृती नांदत होती.
गणेशन यांच्या म्हणण्यानुसार, या संस्कृतीतील लोकांची घरे विटांची आणि कौलारू छतांची होती, ते दूरच्या प्रदेशांशी व्यापार करत होते, तामिळ लिपीच्या एका प्राचीन स्वरूपाचा वापर करत होते आणि पाण्याचे व्यवस्थापन करण्यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 2013 मध्ये किळदीच्या पहिल्या खुणा शोधून काढल्या. आतापर्यंत या प्राचीन शहरी वस्तीचा आणि तिच्या दफनभूमीचा काहीच भागाचे उत्खनन करण्यात आले आहे.
कोंडगाई येथे सापडलेल्या मानवी अवशेषांमधून काढलेल्या डीएनएचे विश्लेषण करून गणेशन आणि त्यांची टीम किळदीच्या रहस्यमय रहिवाशांबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन कवटी 2021 मध्ये उत्खननादरम्यान सापडल्या होत्या. गणेशन यांनी सांगितले की, संशोधकांना हे अवशेष दफन केलेल्या कलशांमध्ये (burial urns) सापडले, ज्यातील डझनावर कलश आतापर्यंत येथे मिळाले आहेत. संशोधनानुसार, किळदीचे लोक मृतांना दागिने, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थांसह या कलशांमध्ये दफन करत होते.