Italy Ancient Tomb | इटलीत सापडली २५०० वर्षांपूर्वीच्या ‘योद्धा-राजकुमारा’ची कबर

रथ, शस्त्रे आणि सोने-चांदीच्या दागिन्यांसह दफन
Italy Ancient Tomb |
Italy Ancient Tomb | इटलीत सापडली २५०० वर्षांपूर्वीच्या ‘योद्धा-राजकुमारा’ची कबर
Published on
Updated on

रोम : इटलीतील पुरातत्त्व शास्त्रज्ञांना एका प्राचीन ‘योद्धा-राजकुमारा'ची शाही कबर शोधण्यात मोठे यश आले आहे. हा राजकुमार रोमन साम्राज्यापूर्वीच्या काळातील असून, त्याच्या कबरीमध्ये त्याचा रथ आणि विविध शस्त्रेही सुस्थितीत सापडली आहेत. ही कबर इसवी सन पूर्व ६ व्या शतकातील एका विस्तीर्ण दफनभूमीचा भाग असून, त्या काळातील गूढ संस्कृतीच्या उच्चभ्रू राज्यकर्त्यांच्या अंत्यसंस्कारांबद्दल यातून नवीन माहिती समोर येत आहे.

पुरातत्त्व विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा ऐतिहासिक शोध इटलीच्या पूर्व किनारपट्टीवरील अ‍ॅड्रिएटिक समुद्राजवळ असलेल्या 'सिरोलो' शहरात लागला आहे. इसवी सन पूर्व ६ व्या शतकात या भागात 'पिचेनी' नावाचा एक प्राचीन इटालिक गट राहत होता. यांच्या उत्तरेला 'एट्रस्कॅन' संस्कृतीच्या सीमा होत्या. या पिचेनी लोकांचे फारसे लिखित दस्तावेज उपलब्ध नसल्यामुळे, त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी पुरातत्त्वीय उत्खनन हाच एकमेव मार्ग आहे. यापूर्वी २०२० मध्ये याच परिसरातील 'पिनी' दफनभूमीत एका राजकुमाराची कबर सापडली होती, ज्यामध्ये लोखंडी चाकांचा रथ आणि हेल्मेट मिळाले होते.

आता तशीच ही दुसरी भव्य कबर सापडली आहे. एका मोठ्या वर्तुळाकार कुंपणाच्या मध्यभागी या योद्धा-राजकुमाराला दफन करण्यात आले होते. संशोधनादरम्यान पुढील गोष्टी आढळून आल्या : लाकडी रथ: सुमारे २५०० वर्षांपूर्वी या सरदारासोबत त्याचा दोन चाकांचा लाकडी रथही अखंड दफन करण्यात आला होता. युद्ध साहित्य : राजकुमारासोबत त्याचे हेल्मेट आणि एक कुर्‍हाड ठेवलेली होती. भोजनाचे अवशेष: कबरीत मातीच्या झाकणांनी बंद केलेली कांस्य भांडी सापडली आहेत. यामध्ये काही सेंद्रिय अवशेष आहेत.

पुरातत्त्वज्ञांच्या मते, हे अंत्यसंस्काराच्या वेळच्या मेजवानीचे किंवा मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी ठेवलेले अन्न असावे. या योद्धा-राजकुमाराच्या शेजारीच एका महिलेची कबरही सापडली आहे. तिला कपडे, पादत्राणे आणि अनेक प्राचीन धातूच्या सेफ्टी पिन्स सोबत दफन करण्यात आले होते. तिच्या डोक्याजवळ अम्बरचा खडा असलेली एक महाकाय पिन सापडली आहे, जी कदाचित तिच्या केसांच्या रचनेचा किंवा मुकुटाचा भाग असावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news