

माद्रिद : स्पेनमधील बार्सिलोना येथील 14 व्या शतकातील एका प्रसिद्ध मठात उत्खनन करणार्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यकारक शोध लागला आहे. येथील आठ थडगी उघडली असता, त्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 25 मानवी सांगाडे सापडले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये एका मध्ययुगीन राणीच्या अस्थींचाही समावेश आहे. ‘कल्चर इन्स्टिट्यूट ऑफ बार्सिलोना’ने 28 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनातून ही माहिती समोर आली आहे.
अरागॉन आणि व्हॅलेन्सियाचे राजे ‘जेम्स द्वितीय’ यांच्या पत्नी राणी एलिसेंडा ऑफ मोंटकाडा यांनी सात शतकांपूर्वी बार्सिलोना येथे ‘रॉयल मॉनेस्टरी ऑफ सांता मारिया पेड्रालबेस’ या मठाची स्थापना केली होती. राणीचे जीवन आणि 14 व्या शतकातील महिला संन्यासी समुदायाच्या राहणीमानाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाने तिच्या थडग्याचा शोध घेतला. थडग्यांच्या तपासणीतून असे समोर आले आहे की, एका देशाची राणी असूनही एलिसेंडा यांना अत्यंत साध्या कपड्यांमध्ये एका छोट्या लाकडी पेटीत दफन करण्यात आले होते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे राणीच्या अगदी जवळच्या सहकार्यांच्या थडग्यांमध्ये अशा काही व्यक्तींचे सांगाडे सापडले आहेत, ज्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता.
यात चाकू भोसकून हत्या करण्यात आलेल्या पुरुषांचे सांगाडे, तसेच गरोदरपणाच्या मध्यातच मृत्यू झालेल्या एका महिलेच्या सांगाड्याचा समावेश आहे. इतिहासाचा मागोवा घेतला तर, राणी एलिसेंडा या 30 वर्षांच्या असताना त्यांनी 55 वर्षांच्या राजे जेम्स द्वितीय यांच्याशी विवाह केला होता. जेम्स यांच्या तिसर्या पत्नीच्या निधनानंतर अवघ्या एका महिन्यातच हा विवाह झाला होता आणि एलिसेंडा या राजाच्या पहिल्या 10 मुलांच्या सावत्र आई बनल्या होत्या. राजे जेम्स द्वितीय (ज्यांना ‘जेम्स द जस्ट’ असेही म्हटले जायचे) हे 1291 ते त्यांच्या मृत्यूपर्यंत (1327) अरागॉन आणि व्हॅलेन्सियाचे राजे होते.
राजाच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात जेव्हा ते आजारी होते, तेव्हा एलिसेंडा यांनी बार्सेलोनामध्ये ‘ऑर्डर ऑफ द पुअर क्लेअर्स’ या कॅथलिक संन्यासिनींच्या (नन्स) समूहासाठी या मठाची स्थापना केली होती. राजाच्या मृत्यूनंतर, एलिसेंडा या पेड्रालबेस मठाशेजारील एका छोट्या राजवाड्यात राहू लागल्या आणि 1364 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. सन 1326 मध्ये स्थापन झालेल्या या पेड्रालबेस मठाच्या 700 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून संशोधकांनी मठाच्या सुरुवातीच्या काळाशी संबंधित व्यक्तींची आठ ऐतिहासिक थडगी उघडली. यामध्ये राणी एलिसेंडा आणि मठाच्या पहिल्या दोन मुख्य संन्यासिनींच्या थडग्यांचा समावेश होता.