23 हजार फूट खोल समुद्रात जहाजाचे अवशेष | पुढारी

23 हजार फूट खोल समुद्रात जहाजाचे अवशेष

कॅलिफोर्निया : 1944 मध्ये ‘बॅटल ऑफ समर’दरम्यान समुद्रात बुडालेल्या अमेरिकन जहाजाचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. फिलिपीनच्या सागरामध्ये या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक खोल पाण्यात सापडलेले हे जहाज आहे. संशोधकांनी हे जहाज तब्बल 22,621 फूट खोल पाण्यातून शोधून काढले आहे. खोल समुद्रात सापडलेले हे अवशेष ‘यूएसएस सॅम्युअल बी रॉबर्टस्’ नामक जहाजाचे आहेत. अब्जाधीश संशोधक व्हिक्टर वेस्कोवो आणि जेरमी मॉरिजेट यांनी हे अवशेष शोधले आहेत. सुमारे 78 वर्षांपूर्वी बुडालेल्या या जहाजाला ‘सॅमी बी’ या नावानेही ओळखले जाते.

सुमारे 306 फूट लांब असलेले हे एक लढाऊ जहाज होते. दुसर्‍या महायुद्धादरम्यान ते अमेरिकन नौदलासाठी तयार करण्यात आले होते. जहाजाला ‘बॅटल ऑफ समर’दरम्यान जलसमाधी मिळाली होती. जपानबरोबर आमने-सामने झालेल्या लढाईत ऑक्टोबर 1944 मध्ये ते सॅमी बी समुद्रात बुडाले. जहाजाबरोबरच 224 कर्मचार्‍यांनाही जलसमाधी मिळाली होती. सबमर्सिबल व्हेईकल आणि सोनार बिमिंग जहाजांचा वापर करून कॅलाडन ओशनिकचे संस्थापक वेस्कोवो व त्यांच्या पथकाने 17 ते 24 जून यादरम्यान सहावेळा डाईव केली. 18 जूनला तीन ट्यूबच्या टारपिडो लाँचरच्या मदतीने सॅमी बीच्या अवशेषांचा शोध लावला.

Back to top button