

वॉशिंग्टन : पुरातत्त्व शास्त्रज्ञांना एल साल्वाडोरमध्ये 2,400 वर्षे जुन्या व अत्यंत दुर्मीळ बाहुल्या सापडल्या आहेत. त्यांचा वापर सार्वजनिक विधींमध्ये पौराणिक किंवा वास्तविक घटनांचे सादरीकरण करण्यासाठी केला जात असावा, असे संशोधकांना वाटते. या शोधामुळे एल साल्वाडोरमधील लोक मध्य अमेरिकेच्या विस्तीर्ण संस्कृतीशी अधिक समरस होते, असे नव्या अभ्यासातून सूचित होते.
2022 मध्ये, संशोधकांना एका मोठ्या पिरॅमिडच्या माथ्यावर पाच सिरेमिक बाहुल्या सापडल्या. यामध्ये चार स्त्रिया आणि एक पुरुष अशा बाहुल्यांचा समावेश होता. त्यांचा अद्याप वेगवेगळ्या द़ृष्टिकोनातून अभ्यास केला जात होता. प्रथमतः या बाहुल्या ऐश्वर्यशाली दफन विधींचा भाग असाव्यात, असे वाटले. मात्र, तेथे मानवी अवशेष न सापडल्याने, या बाहुल्या सार्वजनिक विधींसाठी वापरण्यात आल्या असाव्यात, असा अंदाज पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या बाहुल्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नाट्यमय हावभाव, जे वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यावर बदलतात. संशोधनाचे मुख्य लेखक आणि व्हर्साय विद्यापीठाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ जॅन सिझमांस्की यांच्या मते, डोळ्याच्या समोरून पाहिल्यास या बाहुल्या रागीट दिसतात, वरून पाहिल्यास त्या हसत असल्यासारख्या वाटतात आणि खालील कोनातून पाहिल्यास भयभीत भासतात. हे मुद्दाम घडवले असावे, जेणेकरून विधींच्या वेळी वेगवेगळ्या भावना सादर करता येतील. पाच बाहुल्यांपैकी तीन मोठ्या (सुमारे 30 सेमी) असून, दोन लहान आहेत (18 सेमी आणि 10 सेमी). मोठ्या बाहुल्या नग्न असून, त्यांना केस किंवा दागिने नाहीत. मात्र, लहान बाहुल्यांच्या कपाळावर केस व कानातले दागिने आहेत.
मोठ्या बाहुल्यांचे डोके हलते व तोंड उघडे आहे, जसे आधुनिक खेळण्यांमध्ये असते. त्यामुळे त्या एखाद्या नाट्यमय प्रसंगात वापरण्यात आल्या असाव्यात. त्या पौराणिक किंवा वास्तविक घटनांचे प्रातिनिधिक स्वरूप असू शकतात. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी इतर ठिकाणीही बाहुल्यांचे काही भाग सापडल्याचे नमूद केले आहे. यातील एका लहान बाहुल्याचा वरचा भाग पोकळ धडाशी जुळतो, त्यामुळे हा जन्माचा एखादा विधी पुन्हा साकारण्यासाठी वापरण्यात आला असावा, अशी शक्यता संशोधकांनी मांडली आहे.