अबब…! एका पाण्याच्या बाटलीची किंमत 65 लाख | पुढारी

अबब...! एका पाण्याच्या बाटलीची किंमत 65 लाख

न्यूयॉर्क ः एखाद्या पाण्याच्या बाटलीची किंमत जास्तीत जास्त किती असू शकेल असे तुम्हाला वाटते? पंधरा-वीस रुपयांच्या पाण्याच्या बाटल्या आपण आजपर्यंत अनेक वेळा घेतल्या असतील. मात्र, तब्बल 65 लाख रुपयांची पाण्याची बाटली आहे असे म्हटल्यावर आपल्या भुवया निश्‍चितच उंचावू शकतात. अर्थातच ही साधी बाटली नसून हिरेजडीत आहे!

या ‘बेव्हर्ली हिल 90 एच 20’ च्या पाण्याच्या बाटलीची किंमत अशी 65 लाख रुपये आहे. 65 लाख रुपयांमध्ये आपण एखादे घर बांधू शकतो, गाडी घेऊ शकतो किंवा अन्य काही इच्छा असल्यास त्या पूर्ण करू शकतो. इतक्या पैशांमध्ये केवळ एक पाण्याची बाटली घ्यायची म्हटल्यावर आपण विचारात पडू. मात्र, ही पाण्याची बाटली सोने आणि हिरेजडीत आहे, ती मौल्यवान आहे हे समजल्यावर आपल्याला या किमतीचे अप्रूप वाटणार नाही.

बेव्हर्ली कंपनीने बाजारात आणलेल्या या बाटलीचे झाकण 14 कॅरेट व्हाईट गोल्डपासून बनवलेले आहे. याशिवाय त्याच्या झाकणावर 250 हिरे जडवलेले आहेत. त्यामुळेच या बाटलीची किंमत अशी लाखो रुपयांची आहे. अर्थात अशा बाटलीतून पाणी घेऊन ते पिण्यासाठी ती व्यक्‍तीही पाण्यासारखा पैसा खर्च करणारीच असावी लागणार हे उघडच आहे!

Back to top button