फ्रान्समध्ये स्वस्तिक कोरलेल्या 2300 वर्षांपूर्वीच्या तलवारीचा शोध

या दोन्ही तलवारी त्यांच्या मूळ म्यानासह संपूर्ण अवस्थेत आढळून आल्या
2300-year-old-sword-with-swastika-found-in-france
फ्रान्समध्ये स्वस्तिक कोरलेल्या 2300 वर्षांपूर्वीच्या तलवारीचा शोधPudhari File Photo
Published on
Updated on

पॅरिस : फ्रान्समध्ये सेल्टिक लोह युगातील सुमारे 2,300 वर्षे जुन्या स्मशानभूमीत दोन दुर्मीळ तलवारी सापडल्या आहेत. त्या युरोपमधील फारच दुर्मीळ तलवारी असल्याचे फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह आर्किऑलॉजिकल रिसर्चने म्हटले आहे. या तलवारींच्या शोधाला ऐतिहासिक महत्त्व असून त्यातील एक तलवार अतिशय सुबक सजवलेली असून तिच्यावर सूक्ष्म स्वस्तिक चिन्हे कोरलेली आहेत.

या दोन्ही तलवारी त्यांच्या मूळ म्यानासह संपूर्ण अवस्थेत आढळून आल्या. एका तलवारीचे म्यान तांब्याच्या मिश्रधातूपासून बनवलेले असून कमरेला अडकवण्यासारखे डिझाईन करण्यात आले आहे. या म्यानाच्या कडांवर अनेक झळाळती रत्ने जडवली असून त्यापैकी किमान दोन रत्नांवर स्वस्तिक चिन्हे कोरलेली आहेत. युरोपमध्ये स्वस्तिक चिन्ह हिटलरच्या नाझी राजवटीशी संबंधित असल्यामुळे त्याचा नकारात्मक संदर्भ घेतला जातो. पण या चिन्हांचा प्राचीन काळात वेगळा अर्थ होता. विशेषतः भारत भूमीतील अनेक धर्मांमध्ये स्वस्तिक चिन्ह हे एक मंगल, शुभ चिन्ह म्हणून प्राचीन काळापासून आजपर्यंत वापरले जात असते.

भूमध्य समुद्र क्षेत्रातही स्वस्तिक हे एक सामान्य सजावटीचे चिन्ह होते आणि पाचव्या शतकाच्या अखेरीस व चौथ्या शतकाच्या पहिल्या भागात मुख्य भूमी युरोपातील सेल्टिक लोकांनी याचा उपयोग स्वतःच्या सांस्कृतिक उद्देशांसाठी केला, असे पुरातत्त्वज्ञ व्हिन्सेंट जॉर्जेस यांनी स्पष्ट केले. मात्र, या चिन्हांचे सेल्टिक लोकांसाठी नेमके काय महत्त्व होते, हे अजून स्पष्ट झालेले नाही. या तलवारी व अन्य दफनवस्तू 2022 साली फ्रान्समधील क्रूझिए-ले-न्युफ या 1,500 लोकवस्तीच्या गावात सापडल्या. दुसर्‍या लोह युगात (इ.स.पू. 450 ते 52) हे गाव शक्तिशाली सेल्टिक जमाती असलेल्या अर्वर्नी, एदुई आणि बिटुरीज यांच्या अतिक्रमणाच्या टप्प्यावर होते. संशोधकांनी येथे सुमारे 650 चौरस मीटर क्षेत्रफळाचे दफन क्षेत्र उघडकीस आणले, जिथे 100 पेक्षा जास्त कबरी होत्या. या स्मशानभूमीत सर्वात महत्त्वाचे शोध म्हणजे या दोन अतिशय सुस्थितीत असलेल्या तलवारी.

त्यापैकी एक छोटी तलवार, जी स्वस्तिक चिन्हांनी सजलेली आहे, तिच्या म्यानाचे एक्स-रे विश्लेषण करण्यात आले. त्यातून तलवारीच्या टोकाजवळ वर्तुळ आणि अर्धचंद्र या प्रतीकांचा शोध लागला, ज्यातून ही तलवार चौथ्या शतकाच्या प्रारंभी तयार झाली असावी, असा अंदाज आहे. हे प्रतीक सूर्य आणि चंद्राशी संबंधित असून त्यावेळी अस्तित्वात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या तलवारींमध्ये असा साकल्यवादी (cosmological) अर्थ असलेले डिझाईन सामान्य होते. अशा प्रकारचे डिझाईन्स अन्य सेल्टिक आणि इटलीतील एत्रुस्कन तलवारींवरही आढळतात.

दुसरी तलवार लांब असून तिच्या म्यानाला अजूनही कंबरेला लावण्याच्या अंगठ्या आहेत. या म्यानावरही काही बांगड्यांप्रमाणे, डोळ्यासारखे डिझाईन्स कोरलेले आहेत, जे त्या काळातील लोकप्रिय सजावटीचे तत्त्व होते. लांब तलवार प्रत्यक्ष वापरासाठी योग्य होती. पण स्वस्तिक चिन्ह असलेली छोटी तलवार प्रतीकात्मक होती, असे जॉर्जेस म्हणाले. ती तलवार लष्करी अधिकार व नेतृत्वाचे प्रतिक असावे. जॉर्जेस यांनी नमूद केले की, ही तलवार इ.स.पू. 387 मध्ये रोमवर झालेल्या गॉल्सच्या आक्रमणाच्या सुमारास बनवलेली असावी. मात्र यापेक्षा अधिक निश्चित माहिती सध्या उपलब्ध नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news