

तेल अवीव : इस्रायलमधील पुरातत्त्व संशोधकांना जेरुसलेममधील ‘सिटी ऑफ डेव्हिड’ येथे 2300 वर्षे जुनी सोन्याची अंगठी सापडली असून, ती हेलेनिस्टिक काळातील (ग्रीक कालखंडातील) असल्याचे सांगितले जात आहे. या अंगठीत एक लाल रत्न असून ते बहुधा गार्नेट असावे आणि असे मानले जात आहे की, ही अंगठी एखाद्या तरुणाने प्रौढत्वात प्रवेश करण्याच्या धार्मिक विधीच्या भाग म्हणून जमिनीत पुरली असावी.
ही अंगठी इस्रायली अँटिक्विटीज अॅथॉरिटी (आयएए) आणि तेल अवीव विद्यापीठाच्या संशोधकांनी संयुक्तपणे शोधली असून, ती हेलनिस्टिक कालातील दुसरी सोन्याची अंगठी आहे, जी गेल्या एका वर्षात आढळली आहे. ‘हे दागिने बहुधा त्या काळातल्या विशिष्ट प्रथेच्या अनुषंगाने पुरले गेले असावेत, जी बाल्यावस्थेतून प्रौढत्वात प्रवेशाचा संकेत मानली जायची’ असे ‘आयएए’ने म्हटले आहे. ‘सिटी ऑफ डेव्हिड’ येथे उत्खननादरम्यान रिवका लेंगलर नावाच्या संशोधिकेच्या सहकार्याने, बेन याने माती गाळताना अचानक ही अंगठी पाहिली. त्याला सुरुवातीला वाटलं की, कदाचित एखाद्या आधुनिक कर्मचार्याने चुकून ती पाडली असेल, लेंगलर म्हणाल्या, पण मी तपासणी केली आणि लगेचच ओळखलं की ही प्राचीन वस्तू आहे. ही अंगठी ज्या स्तरातून सापडली, तो इ.स.पू. तिसर्या शतकाचा उत्तरार्ध ते दुसर्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. म्हणजेच ‘सेकंड टेम्पल पीरियड’ जेव्हा जेरुसलेममधील दुसरं मंदिर अस्तित्वात होतं (इ.स.पू. 516 ते इ.स. 70).