कासवांची लुप्त झालेली प्रजाती पुन्हा आढळली! | पुढारी

कासवांची लुप्त झालेली प्रजाती पुन्हा आढळली!

वॉशिंग्टन ः विशालकाय कासवांच्या एका जुन्या प्रजातीला आता पुन्हा एकदा शोधून काढण्यात आले आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी ही प्रजाती लुप्त झाली आहे असे मानले जात होते. मात्र, ही प्रजाती अद्यापही अस्तित्वात असून ती अतिशय चांगल्या स्थितीतही आहे असे आढळले आहे. फर्नांडिना आयलंडवर ही प्रजाती आढळली.

या कासवांना ‘फँटास्टिक जायन्ट टॉरटॉईज’ असेही म्हटले जाते. आतापर्यंत 1906 मध्ये एका वैज्ञानिक अभियानात या प्रजातीचे एकच कासव आढळले होते. मात्र, 2019 मध्ये फर्नांडिना बेटावर या प्रजातीचे एक मादी कासवही आढळून आले. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आणि येल युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी 116 वर्षांपूर्वीच्या नमुन्यांशी या फर्नांडा नावाच्या मादीच्या डीएनएची तुलना केली.

हे दोन्ही ‘चेलोनोइडिस फँटास्टिकस्’ कासवंच असल्याचे त्यामधून निष्पन्न झाले. ही कासवं गॅलापॅगोस विशाल कासवांच्या अन्य प्रजातींपेक्षा अनुवंशिक रूपाने वेगळी आहेत. संशोधक पीटर ग्रँट यांनी सांगितले की अनेक वर्षे असेच समजले जात होते की 1906 मध्ये आढळलेल्या नमुन्याची कासवं आता लुप्त झाली आहेत. मात्र, ही प्रजाती अद्यापही अस्तित्वात आहे हे आता सिद्ध झाले आहे.

Back to top button