कर्करोगावर प्रभावी औषध; सहा महिन्यांत गायब झाला ट्यूमर! | पुढारी

कर्करोगावर प्रभावी औषध; सहा महिन्यांत गायब झाला ट्यूमर!

न्यूयॉर्क ः जगभरात कर्करोगाने मृत्यू होणार्‍या लोकांचे प्रमाण अधिक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाने जगातील अनेक लोक ग्रासले जात असतात. आता रेक्टल कॅन्सर असलेल्या अमेरिकेमधील काही रुग्णांवर एका औषधाचा नुकताच चमत्कार वाटावा असा परिणाम दिसला आहे. एका अत्यंत लहान क्‍लिनिकल चाचणीत, 18 रुग्णांनी ‘डॉस्टारलिमॅब’ नावाचे औषध सुमारे सहा महिने सातत्याने घेतले. त्याचा परिणाम असा झाला की या सहा महिन्यांनंतर त्या सर्वांच्या शरीरातील कॅन्सरचा ट्यूमर गायब झाला!

या संशोधनाबाबतची माहिती समोर आल्यानंतर हे औषध खरोखरच कर्करोगावरील रामबाण औषध ठरू शकते का यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या, संशोधन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ‘डॉस्टारलिमॅब’ हे औषध प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या रेणूंपासून बनवलेले आहे. हे औषध मानवी शरीरात पर्यायी प्रतिपिंडाप्रमाणे काम करते. संबंधित प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या सर्व 18 रुग्णांना गुदाशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते. या सर्व रुग्णांना समान प्रमाणामध्ये हे औषध देण्यात आले.

उपचारांचा परिणाम असा झाला की या सर्वच्या सर्व अठरा रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे नष्ट झाला. शारीरिक तपासणीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये सध्या कॅन्सरचा कुठलाही ट्यूमर सापडलेला नाही. एंडोस्कोपी, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी किंवा पीईटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनच्या माध्यमातून चाचण्या करण्यात आल्यानंतरही त्यांच्या शरीरात कॅन्सरचा ट्यूमर आढळला नाही. न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस डायझ यांनी ‘असा प्रकार कर्करोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे’ असे सांगितले. ‘डॉस्टारलिमॅब’ औषध एंडोमिट्रियल कॅन्सरवरही वापरले गेले आहे. या औषधाला अमेरिका आणि युरोपमध्ये 2021 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्याची निर्मिती करणार्‍या ‘टेसारो’ कंपनीने 2020 मध्ये त्याचे उत्पादन सुरू केले होते.

Back to top button