

वॉशिंग्टन ः अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ला चांद्रभूमीवर रहस्यमय टेकड्या आढळून आल्या आहेत. या टेकड्या पाहून वैज्ञानिकही चकीत झाले आहेत. या टेकड्यांचे रहस्य उलगडण्यासाठी आता 'नासा' एक विशेष रोव्हर पाठवणार आहे. हे रोव्हर या ग्रुइथुइसेन टेकड्यांचा अभ्यास करील आणि तेथील भूगर्भीय वैशिष्ट्यांचा छडा लावेल. या टेकड्या चिकट मॅग्मापासून बनलेल्या असून त्यांच्यामध्ये सिलिका मोठ्या प्रमाणात आहे असे संशोधकांना वाटते. एखाद्या ग्रॅनाईटसारखी त्यांची स्थिती असते.
पृथ्वीवर अशा प्रकारच्या संरचनेसाठी पाण्याने भरलेले समुद्र आणि टेक्टॉनिक प्लेटस्ची गरज असते. मात्र, चंद्रावर हे दोन्ही नाहीत व तरीही अशी संरचना असल्याने संशोधक हैराण आहेत. या टेकड्यांची निर्मिती कधी व कशी झाली याबाबत संशोधकांना ठोस माहिती नाही. 'नासा' 2025 पर्यंत लूनार वुलकान इमेजिंग यान पाठवणार आहे. त्यामध्ये पाच उपकरणे बसवलेली असतील. पृथ्वीवरील दहा दिवसांच्या काळात (चंद्रावरील एक दिवस) 'लूनार-वाईस' मिशन ग्रुइथुइसेनच्या टेकड्यांपैकी एका शिखराची तपासणी करील.
हे यान चंद्राच्या रहस्यमय टेकडीच्या वरील स्तराचा अभ्यास करील व त्याबाबतच्या नोंदी पृथ्वीवर पाठवेल. या अभ्यासातून भविष्यातील रोबोटिक आणि अर्तेमिस मानव मोहिमेसाठीची उपयुक्त माहिती मिळेल. अर्तेमिस मोहिमेत 'नासा' या दशकाच्या अखेरपर्यंत पहिला महिला आणि पुरुष अंतराळवीरांना चांद्रभूमीवर उतरवणार आहे. 'अपोलो' मोहिमांनंतर दीर्घकाळ चंद्रावर कुणीही उतरलेले नाही.