

कैरो : इजिप्तमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी एका दुर्मीळ वर्तुळाकार वास्तूचा शोध लावला आहे. हे मंदिर ‘पेलुसियस’ या स्थानिक देवतेला समर्पित असल्याचे इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने जाहीर केले आहे. सुमारे 2,200 वर्षे जुन्या असलेल्या या धार्मिक इमारतीमध्ये पाण्याची गुंतागुंतीची पायाभूत सुविधा आढळून आली असून, ही वास्तू एकेकाळी नाईल नदीशी जोडलेली होती. यावरून या पवित्र स्थानाचा वापर ‘जलविधीं’साठी केला जात असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर सिनाई प्रांतातील नाईल नदीच्या खोर्याच्या पूर्व टोकावर वसलेल्या ‘पेलुसियम’ या प्राचीन शहरातील ‘टेल अल-फरामा’ येथे हे उत्खनन करण्यात आले. पेलुसियम हे शहर नाईल नदीच्या मुखाशी असलेल्या मोक्याच्या ठिकाणामुळे फॅरोनिक काळात एक महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखले जात असे. पुढे रोमन साम—ाज्याच्या काळात त्याचे रूपांतर एका गजबजलेल्या व्यापारी बंदरात आणि सीमा शुल्क केंद्रात झाले. याच ठिकाणी 2022 मध्ये गुलाबी ग्रॅनाईटपासून बनवलेले ‘झ्यूस’ देवाचे मंदिरही सापडले होते.
या वास्तूचा शोध सर्वप्रथम 2019 मध्ये लागला होता. सुरुवातीला केवळ एक चतुर्थांश भागाचे उत्खनन झाले असताना, तेथील विटांच्या वर्तुळाकार रचनेवरून पुरातत्त्वशास्त्रज्ञांना वाटले की, ते शहराचे ‘सिनेट हाऊस’ (सभागृह) असावे. मात्र, संपूर्ण उत्खनन पूर्ण झाल्यावर या इमारतीचे खरे स्वरूप समोर आले. या मंदिराच्या मध्यभागी सुमारे 115 फूट (35 मीटर) व्यासाचे एक प्रचंड वर्तुळाकार कुंड आहे. कुंडाच्या मध्यभागी एक चौरस चौथरा आहे. संशोधकांच्या मते, यावर ‘पेलुसियस’ देवतेची भव्य मूर्ती असावी.
हे कुंड नाईल नदीच्या एका शाखेशी जोडलेले होते. कुंडाच्या भोवती पाण्याच्या वाहिन्या आणि साठवणूक करण्याची ठिकाणे सापडली आहेत. विशेष म्हणजे, कुंडाच्या आत नाईल नदीचा गाळ आणि पाणी सापडले आहे. ‘पेलुसियस’ या नावाचा मूळ ग्रीक अर्थ ‘चिखल’ किंवा ‘गाळ’ असा होतो, जो या देवतेचा नाईल नदीच्या सुपीक गाळाशी असलेला संबंध अधोरेखित करतो.