

प्राग : चेक प्रजासत्ताकच्या बोहेमिया प्रदेशात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एक अनमोल खजिना सापडला आहे. येथे तब्बल 2,200 वर्षे जुनी एक सेल्टिक वस्ती आढळून आली असून, त्यात शेकडो नाणी आणि एक हजाराहून अधिक दागिन्यांचे तुकडे सापडले आहेत. पूर्व बोहेमिया संग्रहालयाच्या प्रतिनिधींनी एका निवेदनाद्वारे माहिती दिली की, ‘ही वस्ती तिच्या व्याप्ती आणि स्वरूपामध्ये बोहेमियात अतुलनीय आहे.’
या ठिकाणी अंबर आणि उत्कृष्ट मातीच्या भांड्यांसह अनेक प्राचीन आणि मौल्यवान वस्तूंचा साठा सापडला आहे. विशेष म्हणजे, या वस्तीला कोणतीही तटबंदी नव्हती, ज्यामुळे असे सूचित होते की येथे राहणारे लोक प्रादेशिक व्यापारात अत्यंत महत्त्वाचे आणि शक्तिशाली होते. एका महामार्गाच्या बांधकामापूर्वी सर्वेक्षण करत असलेल्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांना या वस्तीचा शोध लागला. मौल्यवान कलाकृतींव्यतिरिक्त, त्यांना इमारतींचे अवशेषही सापडले, ज्यात निवासस्थाने, उत्पादन सुविधा आणि किमान एक धार्मिक स्थळ यांचा समावेश आहे. उत्खननाचे सह-नेतृत्व करणारे हृादेत्स क्रालोवे विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक टॉमस मँगेल यांनी सांगितले की, उत्तर-मध्य चेक प्रजासत्ताकमधील हृादेत्स क्रालोवे शहराजवळील ही वस्ती खूप मोठी आहे.
तिचे क्षेत्रफळ सुमारे 62 एकर (25 हेक्टर) आहे, जे जवळपास 47 अमेरिकन फुटबॉल मैदानांएवढे आहे. निवेदनानुसार, सापडलेल्या नाण्यांमध्ये काही चांदीची तर काही सोन्याची आहेत. नेमकी किती नाणी सापडली आहेत हे अद्याप स्पष्ट नसले तरी, त्यांची संख्या शेकडो असू शकते, असे मँगेल यांनी सांगितले. दागिन्यांमध्ये ‘कांस्य आणि लोखंडाचे ब्राेच (कपड्यांना लावायचे दागिने), बांगड्यांचे तुकडे, पट्ट्यांचे धातूचे घटक, काचेचे मणी आणि बांगड्या’ यांचा समावेश आहे, असेही त्यांनी नमूद केले. ही वस्ती ‘ला तेन’ संस्कृतीच्या काळातील आहे. ही लोहयुगीन संस्कृती युरोपच्या काही भागांमध्ये साधारणपणे इसवी सन पूर्व 450 ते 40 या काळात भरभराटीला आली होती. ही संस्कृती सामान्यतः सेल्टस्शी संबंधित आहे आणि त्यांच्या कला व कलाकृतींमध्ये बरेच साम्य आढळते, ज्यापैकी अनेक रचना मानवरूपी आहेत.