

बर्लिन : जर्मनीतील लायपझिग जवळील एका शेतात धातू शोधक यंत्राचा वापर करणार्या एका प्रमाणित व्यक्तीला सॅक्सनी राज्यातील आतापर्यंतचे सर्वात जुने नाणे नुकतेच सापडले आहे. सुमारे 2,200 वर्षे जुने असलेले हे सोन्याचे नाणे, ज्याला ‘इंद्रधनुष्याचा कप’ म्हणून ओळखले जाते, हे आयात केलेल्या सेल्टिक चलनाचा एक दुर्मीळ नमुना आहे.
सॅक्सनीच्या राज्याच्या मंत्री बार्बरा क्लेप्सच यांनी 27 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘हे सोन्याचे नाणे आपल्या इतिहासाचा एक मूर्त तुकडा आहे आणि सेल्ट्स सोबतच्या व्यापाराबद्दल नवीन माहिती देते.‘चेक रिपब्लिकमधील बोहेमिया येथे यापूर्वी अनेक सेल्टिक नाणी सापडली असली, तरी सॅक्सनीचा प्रदेश सेल्टिक वस्तीच्या बाहेरचा मानला जातो. यापूर्वी सॅक्सनीमध्ये केवळ दोनच सेल्टिक नाणी सापडली होती.
लायपझिगच्या बाहेरील एका भागात सापडल्यामुळे या नवीन नाण्याला ‘गुंडॉर्फ इंद्रधनुष्य कप’ असे नाव देण्यात आले आहे. ‘इंद्रधनुष्याचा कप’ हे नाव नाण्याच्या वक्र आकारामुळे आणि जिथे इंद्रधनुष्य जमिनीला स्पर्श करते तिथे खजिना सापडतो या अंधश्रद्धेमुळे पडले आहे. हे नाणे प्राचीन सेल्ट्सनी तयार केले होते, जे मुख्य युरोपमध्ये राहणारे आणि नंतर रोमवर हल्ला करणारे पराक्रमी योद्धे होते.
‘गुंडॉर्फ इंद्रधनुष्य कप’च्या दर्शनी भागावर एका हरणाचे किंवा तत्सम प्राण्याचे विशिष्ट शैलीतील डोके आहे, तर मागील बाजूस जाड टोक असलेले उघडे गळ्यातील कडे , गोलाकार कोपरे असलेला तारा आणि गोल दाखवलेला आहे. सॅक्सनी राज्याच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ रेजिना स्मॉलनिक यांनी सांगितले की, हे 2 ग्रॅम (यूएस डाईमच्या वजनाचे) वजनाचे नाणे ‘जवळजवळ टाकसाळीच्या स्थितीत‘ आहे आणि ते चलनात वापरले गेल्याची शक्यता कमी आहे. स्मॉलनिक यांच्या मते, ‘उलटपक्षी, हे नाणे सेल्ट्ससोबत व्यापारी संबंध असलेल्या उच्चभ्रू व्यक्तीचे स्टेटस् सिम्बॉल किंवा मूल्याचे भांडार असण्याची शक्यता आहे.’