37 हजार वर्षांतून एकदा होते लघुग्रहाची पृथ्वीला धडक? | पुढारी

37 हजार वर्षांतून एकदा होते लघुग्रहाची पृथ्वीला धडक?

वॉशिंग्टन ः पृथ्वीजवळून अनेक वेळा लघुग्रह जात असतात. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान तर अशा लघुग्रहांचा एक पट्टाच आहे. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवरून डायनासोर व अन्य काही सजीवांच्या प्रजाती नष्ट झाल्या होत्या. आता याबाबत ‘नासा’ने धक्कादायक माहिती दिली आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की पृथ्वीला दर 37 हजार वर्षांच्या काळात एकदा लघुग्रहाची धडक होते आणि जीवसृष्टीचा र्‍हास होतो.

1 किलोमीटरपेक्षा अधिक व्यासाचा एखादा लघुग्रह पृथ्वीला धडकला, तर पृथ्वीवरील संपूर्ण जीवन संपुष्टात येऊ शकते. या धडकेने लाखो लोकांचा मृत्यू होईल. एवढेच नव्हे तर त्यानंतर होणार्‍या भयावह भूकंपाने तसेच ज्वालामुखीचे स्फोट व त्सुनामीसारख्या आपत्तीने कोट्यवधींचा बळी जात असतो. असा एखादा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर राखेचे ढग सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास अडथळा निर्माण करतील. जग अनेक वर्षे अंधारात बुडून जाईल. यामुळे उर्वरित लोकांच्या जगण्याच्या आशा संपुष्टात येतील. विशेष म्हणजे इतिहासात अनेकदा पृथ्वीने अशा महाकाय लघुग्रहांचा आघात सहन केला आहे.

मात्र, प्रत्येकवेळी ‘क्षमा’ असेही नाव असलेली आपली वसुंधरा काळाच्या कसोटीवर खरी उतरली व तिने स्वतःच स्वतःची पुनर्बांधणीही केली. आतापर्यंत पृथ्वीला तब्बल 3 वेळा अशा भीषण संकटांचा सामना करावा लागला आहे. सुमारे 2.229 अब्ज वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या भूभागात कोसळलेल्या एका लघुग्रहाने याराबुब्बा क्रेटर (विवर) तयार केले होते. रशियाच्या उत्तर सैबेरियातील 3.50 कोटी वर्षांपूर्वींचे विवरही लघुग्रहाच्या धडकेने तयार झाले आहे. मेक्सिकोतील चिक्सुलब क्रेटर 6.60 कोटी वर्षांपूर्वीचे आहे. डायनासोरसह 75 टक्के सजीवांचा नाश करणार्‍या लघुग्रहाच्या धडकेने ते बनले आहे.

Back to top button