इराकमध्ये नदीच्या कोरड्या पात्रात प्राचीन शहराचे अवशेष | पुढारी

इराकमध्ये नदीच्या कोरड्या पात्रात प्राचीन शहराचे अवशेष

बगदाद ः उत्तर इराकमधील तैग्रीस नदीच्या खोर्‍यावर प्राचीन काळापासूनच मानवी संस्कृती नांदत होती. या परिसरातील मेसोपोटेनियन संस्कृतीचे आजपर्यंत बरेच अध्ययन झालेले आहे. आता तैग्रीस नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रात संशोधकांनी 3400 वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष शोधून काढले आहेत. केम्युन नावाच्या ठिकाणी ताम—युगातील या शहराचे अवशेष सापडले आहेत. प्राचीन काळातील मित्तानी साम—ाज्यामधील हे शहर आहे. उत्तर मेसोपोटेमियामध्ये इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1350 या काळात हे सामाज्य अस्तित्वात होते. या शहराचे अवशेष तिथे सापडतील असे दीर्घकाळापासून संशोधकांना वाटत होते.

मात्र, आता दुष्काळामुळे नदीचे पाणी आटत गेल्याने तिच्या कोरड्या पडलेल्या पात्रात उत्खनन करण्याची व हे अवशेष शोधून काढण्याची संधी पुरातत्त्व संशोधकांना मिळाली. यापूर्वी 2018 मध्येही तिथे उत्खनन झाले होते. त्यावेळी एका राजवाड्याचे अवशेष तिथे सापडले होते. या राजवाड्याच्या 22 फूट उंचीच्या भिंती आणि खोल्यांचे अवशेष तिथे सापडले होते. या खोल्या रंगीत म्युरल्सनी सजवलेल्या होत्या. आता नव्या संशोधनात या शहराच्या बहुतांश भागाचे मोजमाप करण्यात व नकाशा बनवण्यात यश आले आहे. याठिकाणी एक औद्योगिक संकुलही होते. तसेच एक बहुमजली गोदामही होते असे दिसून आले आहे. जर्मनीतील तुबींजेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याठिकाणी संशोधन केले आहे.

Back to top button