डायनासोरनाही होत असे कर्करोग | पुढारी

न्यूयॉर्क :

संशोधकांना कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात डायनासोर प्रोविन्शियल पार्कमध्ये सेंट्रोसोरस नावाच्या एक शिंगाच्या डायनासोरचे जीवाश्म 1989 मध्ये सापडले. त्यावेळी त्यांना अतिशय वाईट पद्धतीने वाकडी झालेले एक हाड मिळाले होते. आधी संशोधकांना वाटले होते की या डायनासोरचे हाड फ्रॅक्चर झाले असावे. मात्र, आता अधिक संशोधनानंतर असे दिसून आले आहे की हा डायनासोर हाडाच्या कर्करोगाने ग्रस्त होता. डायनासोरच्या पायाचे हे हाड अनेक वर्षे संशोधनाचा विषय बनले होते. आता हा डायनासोर कर्करोगाने ग्रस्त होता असे दिसून आले. सुमारे 7 कोटी 60 लाख वर्षांपूर्वीचा हा सेंट्रोसोरस डायनासोर आहे. हा डायनासोर सुमारे वीस फूट म्हणजेच सहा मीटर लांबीचा होता. या प्रजातीचे डायनासोर शाकाहारी होते. त्यांच्या नाकाच्या वरच्या बाजूस एक शिंग असे. तसेच मानेवर हाडांची झालर होती. टोरांटोमधील रॉयल ऑन्टेरियो म्युझियममधील संशोधक डेव्हीड इवान्स यांनी सांगितले की ज्या डायनासोरचे जीवाश्म सापडले होते त्याच्या पायाच्या हाडामध्ये सफरचंदाच्या आकाराची गाठ होती. हा डायनासोर अशक्‍त झाला होता आणि मृत्युपूर्वी कर्करोगाशी झुंजत होता. डायनासोरसारख्या विशाल व शक्‍तिशाली प्राण्यातही कर्करोगासारखे आजार होते हे यावरून दिसून येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news