वॉशिंग्टन ः
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सेवेत असणार्या 'एअरफोर्स वन' या विमानाचे अपग्रेडिंग करण्याची तयारी सध्या सुरू आहे. खासकरून या विमानाचा वेग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी जॉर्जियास्थित एक एव्हिएशन कंपनी 'हर्मियस'सोबत करार करण्यात येत आहे.
'हर्मियस' नामक ही कंपनी 'हायपरसोनिक एअरक्राफ्ट' इंजिनची निर्मिती करणार आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकन हवाई दलाकडून निधी पुरवला जात आहे. या इंजिनच्या मदतीमुळे विमानात कमालीची सुधारणा होणार आहे. हायपरसोनिक इंजिन बसवल्यानंतर एअरफोर्स वन या विमानाचा वेग तब्बल पाच पटींनी वाढणार आहे. यामुळे हे विमान लंडनला 7 तासांऐवजी अवघ्या 90 मिनिटांत पोहोचणार आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी सध्या कार्यरत असलेले 'एअरफोर्स वन' हे विमान अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आले आहे. हे एक बोईंग 747-200 बी या सीरिजमधील विमान आहे. ते अवघ्या काही मिनिटांत उड्डाण करण्यासाठी सज्ज असते. उल्लेखनीय म्हणजे या विमानात बसल्यानंतरही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कोणाशीही आरामात आणि विनाव्यत्यय बोलू शकतात. तसेच अमेरिकेवर हल्ला होण्याच्या संभाव्य स्थितीत या विमानाचा वापर मोबाईल कमांड सेंटरसारखा करता येऊ शकतो.
उल्लेेखनीय म्हणजे 'एअरफोर्स वन' हे विमान कधीच एकट्याने उड्डाण करत नाही. त्याच्यासोबत काही कार्गो विमाने तैनात असतात. ही विमाने राष्ट्राध्यक्षांना सुरक्षा देतात.