कोळ्याची भीती वाटते? अर्कनोफोबियाचे असू शकते लक्षण

नवी दिल्ली : अनेकांना आसपासच्या अनेक जीवजंतूंची भीती वाटत असते व ही एक सामान्य बाब आहे. भिंतीवरची पाल किंवा कोळी पाहून थोडी भीती वाटणे एखाद्याबाबत घडू शकते. मात्र, जर कोळी पाहून एखादी व्यक्ती इतकी घाबरत असेल की ती जोरजोराने ओरडणे, धावणे अशा गोष्टी करीत असेल तर हे 'अर्कनोफोबिया'चे लक्षण ठरू शकते. हा एक प्रकारचा भयगंड आहे.

मनोवैज्ञानिकांच्या मते, कोळी व अन्य काही जीवजंतूंविषयी माणसाच्या मनात उपजतच काही भय असू शकते. मात्र, जर हे भय अत्याधिक वाढले तर ती एक मानसिक समस्या ठरते व तिला 'अर्कनोफोबिया' म्हटले जाते. असा फोबिया असलेली व्यक्ती अशा ठिकाणीही जाण्यास घाबरते ज्याठिकाणी कोळी असू शकतात. अशा व्यक्ती कोळ्यांना हटवण्याऐवजी आपले घर किंवा खोलीही सोडू शकतात! अर्कनोफोबियाची अनेक कारणे शकतात. लहानपणी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कोळी पाहून घाबरत व किंचाळत असताना पाहिलेले असेल तर आपल्याही मनात त्याविषयी भीती ठाण मांडून राहू शकते. कोळ्यांच्या विषारी प्रजाती व त्यांच्या दंशामुळे होणार्‍या समस्यांबाबत टी.व्ही.वरील माहिती पाहूनही एखाद्याच्या मनात भीती ठाण मांडून राहू शकते. अशा फोबियामध्ये शरीराला कंप सुटणे, श्वास फुलणे, छातीत वेदना, गुदमरल्यासारखे वाटणे, छातीत धडधड अशी लक्षणे दिसू लागतात. या फोबियावरील उपचारासाठी मनाचिकित्सक किंवा समुपदेशकाची मदत घेतली जाऊ शकते. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news