जागतिक तापमानवाढीचा ध्रुवीय प्रदेशांवर वेगाने परिणाम | पुढारी

जागतिक तापमानवाढीचा ध्रुवीय प्रदेशांवर वेगाने परिणाम

न्यूयॉर्क : जागतिक तापमानवाढीचा परिणाम ध्रुवीय प्रदेशांवर स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः आर्क्टिक म्हणजेच उत्तर ध्रुवावर त्याचा परिणाम इतका झाला आहे की तेथील बर्फाचा स्तर मोठ्या प्रमाणात वितळत आहे. तसेच या परिसरातील तापमानातही वाढ होत आहे. आता तिथे पाऊस आणि बर्फमुक्त भाग अधिक दिसत आहे. हा परिणाम अतिशय धोकादायक व चिंताजनक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

आर्क्टिक प्रदेशात समुद्रातील बर्फ सातत्याने कमी होत आहे. एरव्ही हे बर्फ जितके कमी झाले नव्हते तितके ते सध्या कमी झालेले दिसून येत आहे. याठिकाणी हिमवर्षावाऐवजी पावसाचे प्रमाण अधिक वाढले आहे. आर्क्टिक प्रदेश हा जगातील असा भाग आहे जो जागतिक तापमानवाढीमुळे सर्वाधिक प्रमाणात प्रभावित होत आहे. तेथील हिमनग व हिमनद्या आकसत चालल्या आहेत. कोलोरॅडोच्या नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटमॉस्फिअर रिसर्च इन बोल्डरमधील दोन संशोधक याबाबत सातत्याने संशोधन करीत आहेत. लॉरा लँड्रम आणि मारिका एम नावाच्या या संशोधकांनी केलेल्या संशोधनाची माहिती ‘नेचर क्लायमेट चेंज’ नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या या परिसरात इतक्या वेगाने बदल घडत आहेत की ज्याची आधी कल्पनाही करण्यात आलेली नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button