चमचमीत पदार्थांवर अंतराळात मारा ताव... | पुढारी

चमचमीत पदार्थांवर अंतराळात मारा ताव...

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एक स्पेस कंपनी लवकरच थेट अंतराळात हॉटेल उघडणार आहे. अंतराळातील नेत्रदीपक द़ृश्यांसह हॉटेलच्या सुविधांचा आनंद घेणे हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. अमेरिकन स्पेस कन्स्ट्रक्शन कंपनी ऑर्बिटल असेम्ब्ली कॉर्पोरेशन हे स्वप्न साकार करणार आहे. 2025 मध्ये ते जगातील पहिले स्पेस हॉटेल उघडणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्याचे नाव पायोनियर स्टेशन असेल. अंतराळ हॉटेल बांधण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा 2019 मध्ये जगासमोर मांडण्यात आला होता.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे हॉटेल एका फिरत्या चाकाच्या आकारात असेल, जे पृथ्वीभोवती फिरेल. या हॉटेलमध्ये राहणार्‍या प्रवाशांना खोल्यांच्या खिडक्यांमधून अंतराळाचे विहंगम द़ृश्य पाहता येईल. ऑर्बिटल असेम्ब्लीने 2019 मध्येच स्पेस हॉटेलचे डिझाईन पूर्ण केले. आता त्याला कॅलिफोर्नियास्थित कंपनी गेटवे फाऊंडेशनकडून हे डिझाईन अवकाशात साकारण्यासाठी निधी मिळणार आहे. पायोनियर 2 आठवड्यांसाठी एकाच वेळी 28 लोकांना सामावून घेण्यास सक्षम असेल, तर व्हॉयेजरची क्षमता 400 लोक असेल.

ऑर्बिटल असेंब्लीचे उद्दिष्ट स्पेस बिझनेस पार्क स्थापन करण्याचे आहे. पर्यटकही येथे येऊन अंतराळातील विलोभनीय द़ृश्यांचा आनंद घेऊ शकतील. पायोनियर स्टेशन आणि व्हॉयजर स्टेशन या दोन्ही ठिकाणी ऑफिस स्पेस आणि संशोधन सुविधा देखील भाड्याने दिल्या जातील. कंपनीच्या म्हणण्यानुसार दोन्ही स्पेस हॉटेल्स लक्झरी असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी कृत्रिम गुरुत्वाकर्षणही असणार आहे. म्हणजेच लोक पृथ्वीप्रमाणे अंघोळ, बसणे, चालणे आणि खाणे यासारख्या सामान्य क्रिया करू शकतील. सध्या हे तंत्रज्ञान अंतराळातील कोणत्याही स्पेस स्टेशनमध्ये नाही.

Back to top button