श्वान घेताहेत संक्रमितांचा शोध | पुढारी | पुढारी

श्वान घेताहेत संक्रमितांचा शोध | पुढारी

सँटियागो :

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत आहे. या व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी सध्या अनेक पर्यायांचा वापर करण्यात येत आहे. मात्र, एका देशात कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी चक्क श्वानांचा वापर करण्यात येत आहे. चिलीमधील एका आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्वानांच्या मदतीने कोरोनाग्रस्तांना शोधण्याचे काम करण्यात येत आहे.

सँटियागो आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या ‘गोल्डन रिट्रीव्हर्स’ आणि ‘लॅब्राडोर’ प्रजातींच्या श्वानांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. हे श्वान केवळ वासाच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्याचे कर्तव्य बजावत आहेत. ही श्वाने एक लाल क्रॉसबरोबरच कॅनाईन स्पोर्टस् ग्रीन ‘बायोडिटेक्टर’ जॅकेटमध्ये असतात. 

सँटियागो विमानतळावर उतरणारा प्रत्येक प्रवासी एका पॅडने आपली मान आणि मनगट पुसून ते ते काचेच्या कंटेनरमध्ये टाकतो. हे कंटेनर या श्वानांकडे पाठविले जाते. याच पॅडचा वास घेऊन संबंधित प्रवासी कोरोनाबाधित आहे की नाही याचा शोध हे श्वान लावतात. एखादा प्रवासी जर कोरोनाबाधित आढळला की त्याला लागलीच उपचारासाठी हलविले जाते. यासाठी या श्वानांना खास ट्रेनिंग देण्यात आले आहे. यापूर्वी हे स्निफर श्वान ड्रग्स आणि स्फोटकांचा शोध घेण्याचे काम करत होते. मात्र, आता याबरोबरच ते मलेरिया, कॅन्सर, पार्किसन्स आणि कोरोनाबाधितांचा शोध लावण्याचे काम करत आहेत.

Back to top button