2,000 Year Old Tamil Name | इजिप्तच्या ‘व्हॅली ऑफ किंग्स’मध्ये 2,000 वर्षे जुने तमिळ नाव

प्राचीन भारताच्या जागतिक संबंधांचा मोठा खुलासा
2,000 Year Old Tamil Name
2,000 Year Old Tamil Name | इजिप्तच्या ‘व्हॅली ऑफ किंग्स’मध्ये 2,000 वर्षे जुने तमिळ नाव
Published on
Updated on

कैरो/चेन्नई : इजिप्तमधील प्रसिद्ध ‘व्हॅली ऑफ किंग्स’ येथील खडकांवर सुमारे 2,000 वर्षे जुनी काही नावे कोरलेली सापडली आहेत. यामध्ये ‘सिकाई कोर्रन’, ‘कोपन’ आणि ‘काटन’ यांसारख्या भारतीय नावांचा समावेश असून, या शोधामुळे प्राचीन काळी भारत आणि इजिप्त यांच्यातील सांस्कृतिक व व्यापारी संबंधांवर नवा प्रकाश पडला आहे. संशोधकांना ‘सिकाई कोर्रन’ हे नाव तमिळ-ब—ाह्मी लिपीत लिहिलेले आढळले आहे. तमिळमध्ये ‘सिकाई’ म्हणजे शिखा किंवा ताज आणि ‘कोर्रन’ किंवा ‘कोट्रन’ म्हणजे नेता असा होतो. विशेष म्हणजे, हे नाव तेथील सहा शाही थडग्यांपैकी पाच ठिकाणी कोरलेले मिळाले आहे. ही थडगी मूळतः इसवी सन पूर्व 1600 मधील आहेत. परंतु, त्यानंतर अनेक शतकांनी जगभरातून आलेल्या पर्यटकांनी तेथे आपली नावे कोरली होती.

स्वित्झर्लंडच्या लॉझेन विद्यापीठाचे विद्वान इन्गो स्ट्राऊच आणि फ्रान्सच्या शार्लोट श्मिड यांनी या लेखांची ओळख पटवली आहे. चेन्नई येथे झालेल्या तमिळ शिलालेख परिषदेत त्यांनी ही माहिती सादर केली. एकूण भारतीय लेख 30 असून, त्यापैकी तमिळ लेख 20 आहेत. इतर भाषांमध्ये संस्कृत, प्राकृत आणि गांधारी-खरोष्ठीचा समावेश आहे. यावरून असे सूचित होते की, केवळ दक्षिण भारतच नव्हे, तर पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भारत (आजचा गुजरात आणि महाराष्ट्र) येथूनही लोक इजिप्तला जात असत.

एका संस्कृत लेखानुसार, पहिल्या शतकात पश्चिम भारतावर राज्य करणार्‍या ‘क्षहरात’ वंशाचा एक दूत या ठिकाणी आला होता. तसेच, एका लेखात ‘सिकाई कोर्रन वरा कांता’ असे लिहिले आहे, ज्याचा अर्थ ‘सिकाई कोर्रन येथे आला आणि त्याने पाहिले’ असा होतो. हे वाक्य ग्रीक भाषेतील तत्कालीन प्रचलित वाक्प्रचारांशी साधर्म्य दर्शवते. संशोधकांनी सांगितले की, यातील काही नावे लाल समुद्राच्या किनार्‍यावर असलेल्या ‘बेरेनाइके’ या प्राचीन रोमन बंदरगावरही आढळली आहेत. हे बंदर भूमध्य समुद्र ते हिंद महासागर या दरम्यानच्या व्यापाराचा मुख्य मार्ग होता. या शोधामुळे हे सिद्ध होते की, प्राचीन काळातील भारतीय प्रवासी आणि व्यापारी केवळ व्यापारासाठीच नाही, तर इजिप्तमधील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठीही तिथे जात असत.

व्हॅली ऑफ किंग्समध्ये ग्रीक भाषेतील सुमारे 2,000 लेख सापडले आहेत, जे भूमध्य समुद्राच्या विविध भागांतून आलेल्या प्रवाशांनी लिहिले होते. संशोधकांच्या मते, इतक्या लांबून म्हणजे भारतामधून येणारे व्यापारी सर्वात वेगळे ठरले. प्लिनी आणि टॉलेमीसारख्या रोमन लेखकांनी भारतासोबतच्या व्यापाराचा उल्लेख केला होता. मात्र, भारतीय व्यापारी स्वतः देखील पश्चिमेकडील देशांपर्यंत जात होते का? हा एक प्रश्नच होता. वरिष्ठ शिलालेखतज्ज्ञ वाय. सुब्बारायालु यांच्या मते, हा शोध स्पष्टपणे दर्शवतो की, रोमन काळात भारत आणि पाश्चात्य जगामध्ये द्विपक्षीय (दोन्ही बाजूंनी) व्यापार चालत असे. हजारो वर्षांपूर्वीदेखील जग एकमेकांशी जोडलेले होते आणि भारतीय व्यापारी दूरवर प्रवास करत असत, हेच या शोधातून सिद्ध होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news