

लंडन : युरोपमध्ये ‘इस्ले ऑफ मॅन’ नावाच्या ठिकाणी दोन हजार वर्षांपूर्वीचा रहस्यमय असा ब्राँझचा चमचा सापडला आहे. हा चमचा भविष्यकथनावेळी वापरण्यात येणार्या रक्ताचा वापर असलेल्या विधींवेळी वापरला जात होता, असे संशोधकांचे म्हणणे आहे. युरोपमधील प्राचीन काळातील विधींचा हा एक दुर्मीळ असा पुरावा आहे.
‘इस्ले ऑफ मॅन’ येथे एका खासगी जमिनीत मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने पुरातन वस्तूंचा शोध घेणार्या एका माणसाला हा चमचा सापडला. लोहयुगातील एखाद्या मांत्रिकाने तो दोन हजार वर्षांपूर्वी वापरलेला असावा, असे संशोधकांना वाटते. एखाद्या स्ट्रॉबेरीसारखा त्याचा आकार आहे. युरोपमध्ये असे 28 चमचे आतापर्यंत सापडलेले असून, ते इसवी सन पूर्व 400 ते 100 या काळातील आहेत. मँक्स नॅशनल हेरिटेजमधील आर्कियोलॉजी विभागाचे क्युरेटर अॅलिसन फॉक्स यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, या ठिकाणी होणार्या काही गूढ विधींवेळी हा सपाट चमचा वापरला जात असावा. मात्र, त्याची नेमकी माहिती समजलेली नाही. या ठिकाणी एक वाडगाही सापडला होता. यापूर्वी अनेक ठिकाणी चमच्यांची जोडी सापडलेली होती. हे चमचे पाणी, मद्य किंवा रक्तासारख्या द्रवपदार्थांसाठी वापरले जात होते.
हा नवा चमचा ‘इस्ले ऑफ मॅन’ या ठिकाणी सापडलेला अशा प्रकारचा पहिलाच चमचा आहे.