2000 year old princess death mystery | दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘राजकुमारी’च्या मृत्यूचे उलगडले रहस्य!

2000 year old princess death mystery
दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘राजकुमारी’च्या मृत्यूचे उलगडले रहस्य!
Published on
Updated on

व्हर्साय (पोलंड) : एका लाकडी शवपेटीमध्ये दफन करण्यात आलेल्या प्राचीन युरोपीयन ‘राजकन्येच्या’ मृत्यूबाबतचा अनेक दशकांपासूनचा सस्पेन्स अखेर संपला आहे. एका नवीन संशोधनातून तिच्या मृत्यूचा अचूक काळ समोर आला असून, संशोधकांनी या ऐतिहासिक गुंतागुंतीचा यशस्वीरित्या उलगडा केला आहे.

1899 मध्ये वायव्य पोलंडमधील बागीच गावातील एका खचलेल्या कड्यावरून एक लाकडी शवपेटी खाली पडली होती. या शवपेटीतील दफन करण्याची आगळीवेगळी पद्धत आणि त्यातील मौल्यवान वस्तू पाहून पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या महिलेला ‘प्रिन्सेस ऑफ बागीच’ असे नाव दिले होते. संशोधकांनी ही महिला रोमन काळातील असल्याचे आधीच सांगितले होते; मात्र तिच्या मृत्यूच्या नेमक्या वर्षाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांमध्ये मतभेद होते. साधारणपणे लाकडी शवपेट्या काळानुसार कुजून नष्ट होतात. त्यामुळे अशा शवपेट्या सापडणे अत्यंत दुर्मीळ असते. मात्र, बागीच येथे सापडलेली ही शवपेटी एका अखंड झाडाच्या खोडापासून तयार करण्यात आली होती. ओल्या आणि दमट वातावरणामुळे ही शवपेटी हजारो वर्षे टिकून राहिली. या शवपेटीत महिलेच्या सांगाड्यासोबतच काचेचे मणी, अंबरचे दागिने, पितळी पिन आणि कड्या यांसारख्या वस्तू सापडल्या होत्या.

1980 च्या दशकात करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ही महिला इसवी सन 110 ते 160 च्या दरम्यान मरण पावली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, 2018 मध्ये जेव्हा तिच्या दातांचे ‘कार्बन-डेटिंग’ करण्यात आले, तेव्हा तो काळ चक्क इसवी सन पूर्व 113 ते इसवी सन 65 च्या दरम्यानचा निघाला. वस्तूंचा काळ आणि कार्बन-डेटिंगचा काळ यात मोठी तफावत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. ही विसंगती दूर करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ स्झेसिनच्या संशोधक मार्ता चमेल-र्च्झानोव्स्का यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘डेंड्रोक्रोनोलॉजिकल विश्लेषण’ (वृक्षाच्या वलयांचा अभ्यास) करण्याचा निर्णय घेतला.

संशोधकांनी त्या शवपेटीच्या लाकडातील वलयांचा अभ्यास वायव्य पोलंडमधील इतर झाडांच्या ऐतिहासिक नोंदींशी केला. ‘आर्किओमेट्री’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ज्या ओकच्या झाडापासून ही शवपेटी बनवली होती, ते झाड इसवी सन 120 मध्ये तोडण्यात आले होते. झाड तोडल्यानंतर लगेचच त्यापासून ही शवपेटी तयार केली गेली असावी. या नवीन पुराव्यामुळे आता हे सिद्ध झाले आहे की, ही ‘राजकन्या’ इसवी सन 120 च्या सुमारास मरण पावली होती. या शोधामुळे पुरातत्त्वशास्त्रातील एक मोठे कोडे सुटले असून, रोमन काळातील मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news