

अॅमस्टरडॅम : नेदरलँडस्मधील अॅमस्टरडॅम येथील प्रसिद्ध राईक्स म्युझियममध्ये सध्या एका आगळ्यावेगळ्या वस्तूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल 200 वर्षे जुना कंडोम! ही दुर्मीळ वस्तू 1830 सालातील असून, ती मेंढीच्या अपेंडिक्सपासून बनवण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, हा कंडोम आजही चांगल्या स्थितीत असून, त्यावर एक चित्र छापलेले आहे.
हा कंडोम 19 व्या शतकातील वेश्या व्यवसाय आणि लैंगिकतेवरील एका प्रदर्शनाचा भाग आहे. संग्रहालयाच्या क्युरेटर जॉईस झेलेन यांनी सांगितले की, लिलावात हे कंडोम पाहिल्यावर त्यांना सुरुवातीला हसू आले होते. अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात तपासणी केल्यावर हा कंडोम कधीच वापरला गेला नसल्याचे स्पष्ट झाले. या कंडोमवर वोईला मॉन चोई (ही माझी इच्छा आहे) असे फ्रेंच शब्द लिहिलेले आहेत.
असा अंदाज आहे की, हे कंडोम फ्रान्समधील उच्चभ्रू वेश्यागृहातील ‘स्मृतिचिन्ह’ असावे. जगात अशा प्रकारचे केवळ दोनच कंडोम अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते. हे प्रदर्शन त्या काळातील लैंगिक आरोग्य आणि लैंगिक आजारांच्या धोक्यावर प्रकाश टाकते. हा कंडोम अतिशय नाजूक असल्याने तो नोव्हेंबर अखेरपर्यंतच प्रदर्शनात ठेवला जाणार आहे. या अनोख्या वस्तूने तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे.