गेटस् यांनी खरेदी केली 2.68 लाख एकर जमीन | पुढारी

गेटस् यांनी खरेदी केली 2.68 लाख एकर जमीन

वॉशिंग्टन :

जगातील गर्भश्रीमंत लोकांपैकी एक असलेले व ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेटस् हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी बनले आहेत. अमेरिकेतील 18 राज्यांत नुकतीच त्यांनी 2.68 लाख एकर जमीन खरेदी केली आहे.

बिल गेटस् यांनी जितकी जमीन खरेदी केली आहे, ते पाहता इतकी जमीन अमेरिकेत सध्या कोणाच्याच नावे नाही. यामुळेच ते अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी बनले आहेत. सर्वसामान्यपणे उद्योगपती मोठ-मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, गेटस् यांनी अशी गुंतवणूक न करता 2 लाख 68 हजार 984 एकर जमीन खरेदी केली आहे. गेटस् यांची आता अमेरिकेतील 19 राज्यांत जमीन आहे. अ‍ॅरिझोना येथे जिथे जमीन खरेदी केली आहे, तेथे स्मार्ट सिटी उभारण्याची गेटस् यांची योजना आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार गेटस् यांनी अमेरिकेतील लुसियानात 69 हजार, अर्कानससमध्ये 48 हजार व अ‍ॅरिझोनात 25 हजार एकर जमीन खरेदी केली आहे. ही सर्व जमीन गेटस् यांनी ‘पर्सनल इन्व्हेस्टमेेंट एन्टिटी कॉस्केड इन्व्हेस्टमेंट’च्या माध्यमातून खरेदी केली आहे.

याशिवाय त्यांनी 2018 मध्ये आपले गृहराज्य वॉशिंग्टनमध्ये 16 हजार एकर जमीन खरेदी केली होती. यामध्ये हॉर्स हेवन हिल्सच्या 14 हजार 500 एकर जमिनीचाही समावेश आहे. ही जमीन त्यांनी 1251 कोटी रुपयांना खरेदी केली होती.

Back to top button