कशा बनतात लाल-निळ्या विजा? | पुढारी

Published on
Updated on

वॉशिंग्टन : आकाशात ढगांमधून लखलखत असलेल्या रूपेरी विजा आपण अनेकवेळा पाहतो. मात्र, काही भागांमध्ये लाल व निळ्या रंगाच्याही विजा चमकतात. सुमारे चार वर्षांपूर्वी म्हणजे जुलै 2017 मध्ये हवाई बेटांवरील आसमंतात अशा लाल व निळ्या रंगाच्या विजा लखलखत असताना आढळल्या होत्या. मॉना कियामधील जेमिनाई वेधशाळेच्या जेमिनाई नॉर्थ टेलिस्कोपने त्यांच्या प्रतिमा टिपल्या. आता या विजा कशा निर्माण होतात याबाबत संशोधकांनी माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या नॅशनल ऑप्टिकल- इन्फ्रारेड अ‍ॅस्ट्रॉनॉमी रिसर्च लॅबोरेटरीने नुकतेच या छायाचित्रांना 'इमेज ऑफ द वीक' म्हणून प्रसिद्ध केले आहे. लॅबने म्हटले आहे की ही छायाचित्रे पाहून असे दिसते की जणू काही स्पेशल इफेक्टस्चा वापर होत आहे. या विजांना 'रेड स्पाईटस्' व 'ब्लू जेटस्' म्हटले जाते. त्यांना सामान्य कॅमेर्‍यात टिपून घेणे अतिशय कठीण असते. त्या एक सेकंदाच्या दहाव्या हिश्श्याइतक्याच वेळेत चमकतात व जमिनीवरून त्या पाहता येणे कठीण असते. याचे कारण म्हणजे त्या बहुतांशी वेळी वादळावेळी असलेल्या ढगांमध्ये चकाकतात. खराब हवामानावर लक्ष ठेवणार्‍या टेलिस्कोपच्या कॅमेर्‍यांमध्ये त्या कैद झाल्या आहेत. ही कॅमेरा सिस्टीम दर तीस सेकंदाला आकाशाची प्रतिमा टिपते. सर्वसाधारणपणे विद्युतभारीत हवा, ढग आणि जमिनीच्या दरम्यान विजा निर्माण होतात. 'रेड स्पाईटस्' आणि 'ब्लू जेटस्' हे आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी बनतात व ते अंतराळाच्या दिशेन जातात. 'रेड स्पाईटस्' हे विजेचे 'अल्ट्राफास्ट बर्स्ट' असतात जे वातावरणाच्या वरील क्षेत्रात 37 ते 50 मैल वर असतात. काही 'स्पाईटस्' जेलिफिशच्या आकाराचे असतात. अन्य धाग्यांसारखे असतात. त्यांना 'कॅरोट स्पाईटस्' असे म्हटले जाते. 'ब्लू जेटस्' पृथ्वीच्या जवळच बनतात. ते शंकूच्या आकाराचे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज असतात आणि 'स्पाईटस्'पेक्षाही अधिक चमकदार असतात. ते ढगांवर लखलखत असतात. वादळांचे ढग पृथ्वीपासून चौदा मैल वरही असू शकतात. 'ब्लू जेटस्' तीस मैलांपर्यंत वर वाढत राहतात व नष्ट होतात. ते ताशी 22,300 मैल वेगाने जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news