वॉशिंग्टन : मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इंजिनिअरनी कर्करोगास फैलावण्यापासून रोखण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. कर्करोगाच्या ट्यूमरभोवती एक सुरक्षात्मक आवरण किंवा मेम्ब्रेन असते. उपचारादरम्यान त्यालाच लक्ष्य बनवून ट्यूमरचा विस्तार किंवा रूप परिवर्तनाला रोखले जाऊ शकते असे आढळले आहे.
कर्करोगाच्या पेशींना आपली वाढ करण्यासाठी सर्वात आधी त्यांच्याच सुरक्षा आवरणाला तोडावे लागते. बहुतांश ट्यूमर हे सुरक्षात्मक आवरणात लपेटलेले असतात. ही एक लवचिक भिंतच असते आणि कर्करोगाच्या पेशींचे विभाजन आणि विस्तारावेळी त्यांना पकडून ठेवते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशींना दुसर्या अवयवांमध्ये फैलावण्यापूर्वी आपल्याच अशा संरक्षणात्मक आवरणाला तोडावे लागते. हे आवरण संशोधकांसाठी एक कोडेच बनून राहिले होते. 'एमआयटी'च्या इंजिनिअरनी आता स्तनाच्या कर्करोगाच्या ट्यूमरचे आवरण म्हणजेच मेम्ब्रेनचा अभ्यास केला आहे. नाजूक दिसणारी ही मेम्ब्रेन एखाद्या प्लास्टिक कव्हरसारखी मजबूत असते असे त्यांना दिसून आले. तिच्यामध्ये एखाद्या फुग्यासारखे फैलावण्याचीही क्षमता असते. आपल्या मूळ आकाराच्या दुप्पट आकार ती धारण करू शकते. मात्र, अधिक फुगल्यावर ती फुग्यासारखी फुटून न जाता अधिकच मजबूत होते. त्यामुळे ट्यूमरच्या फैलावण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे या मेम्ब्रेनच्या मदतीनेच कर्करोगाचा फैलाव रोखला जाऊ शकतो असे संशोधकांना वाटते.