पृथ्वीच्या पोटात दडलेत ‘त्या’ खगोलीय पिंडाचे अवशेष | पुढारी

पृथ्वीच्या पोटात दडलेत ‘त्या’ खगोलीय पिंडाचे अवशेष

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेत असलेल्या चंद्राच्या निर्मितीबद्दल वेगवेगळी मते आहेत. यातील एक महत्त्वाचे मत म्हणजे कधीकाळी चंद्र हा आपल्या पृथ्वीचाच एक भाग होता. सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी ‘थिया’ नामक एक प्रोटो प्लॅनेट प्रचंड वेगाने पृथ्वीवर आदळला. यातूनच चंद्राची निर्मिती झाली. यासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार पृथ्वीवर आदळलेल्या या प्रोटो प्लॅनेटचे अवशेष आजही पृथ्वीच्या ‘मेंटल’ नामक थरात दडले आहेत.

या संशोधनातील माहितीनुसार ‘थिया’ या खगोलीय पिंडाचे अवशेष दोन महाद्विपांच्या आकारात मेंटल या पृथ्वीच्या खोल भागातील थरामध्ये टेकड्यांच्या रूपात आजही अबाधित आहे. गेल्या आठवड्यात ‘52 लूनार अँड प्लॅनेटरी सायन्स कॉन्फरन्स’मध्ये अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतील जियोडाईनानिक्सचे विद्यार्थी कियान युआनने सांगितले की, आपण अनेक दशके पश्चिम आफ्रिका आणि पॅसिफिक महासागर परिसराचा अभ्यास केला. पृथ्वीवर आदळलेल्या या खगोलीय पिंडाचे अवशेष दोन महाद्विपांच्या आकारात मेंटल या पृथ्वीच्या आवरणामध्ये असून तो हजारो किलोमीटर लांब आहे. खरेतर मेंटलमधील हा भाग म्हणजे या आवरणातील सर्वात मोठा पर्वतीय भाग आहे. आपल्या शोधपत्रामध्ये युआनने मॉडेलिंग आणि नव्या आईसोटोपिक पुराव्यांवर सविस्तर चर्चा केली.

Back to top button