‘आयआयटी’च्या संशोधकांनी बनवला विषाणुरोधक ‘नॅनोशोट स्प्रे’ | पुढारी

‘आयआयटी’च्या संशोधकांनी बनवला विषाणुरोधक ‘नॅनोशोट स्प्रे’

नवी दिल्‍ली : सध्या देशात कोरोना महामारीची दुसरी लाट कहर करीत आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध प्रकारचे संशोधनही सुरू आहे. आता आयआयटी दिल्‍लीची स्टार्टअप ‘रामजा जेनोसेन्सर’ ने एक असा विषाणुरोधक स्प्रे तयार केला आहे ज्याचा वापर फरशी, कपडे आणि भांडी वगळता अन्य कोणत्याही पृष्ठभागावर करता येऊ शकतो. या स्प्रेला ‘नॅनोशोट स्प्रे’ असे नाव देण्यात आले आहे.

या स्प्रेची खासियत म्हणजे त्याचा प्रभाव 96 तास म्हणजेच चार दिवस राहू शकतो. तसेच हा स्प्रे अल्कोहोल फ्री आहे. ज्यावेळी एखादी व्यक्‍ती कोरोना संक्रमित होते त्यावेळी त्याच्या केवळ एकदाच शिंकल्याने किंवा खोकल्याने तोंडातून सुमारे तीन हजार सूक्ष्म थेंब बाहेर पडतात. त्यांना ‘ड्रॉपलेटस्’ असे म्हटले जाते. हे थेंब आजुबाजूच्या सामानांवर, पृष्ठभागांवर पडतात. या ड्रॉपलेटस्मध्ये विषाणू लपलेले असतात. त्यांच्या संपर्कात आल्यावर अन्य लोकही संक्रमित होण्याचा धोका असतो. त्यावर उपाय म्हणून आयआयटी दिल्‍लीच्या या स्टार्टअपने हा स्प्रे विकसित केला आहे.

‘रामजा जेनोसेन्सर’च्या संस्थापिका डॉ. पूजा गोस्वामी यांनी सांगितले की हा स्प्रे म्हणजे एखादा विषारी पदार्थ नाही. तो बनवण्यासाठी आम्ही काही निवडक नॅनोपार्टिकल्सचा वापर केला आहे. ते ऑर्गेनिक म्हणजेच जैविक कण आहेत. ‘नॅनोशोट स्प्रे’मध्ये हायपोक्लोराइट आणि अल्कोहोल नाही. एनएबीएल मान्यताप्राप्‍त प्रयोगशाळेत त्याची चाचणी घेण्यात आली असून त्यापासून कोणताही अ‍ॅलर्जी रिअ‍ॅक्शन दिसून आला नाही. या स्प्रेच्या वापराने तीस सेकंदांमध्येच विषाणू, जीवाणू,कवक नष्ट होण्यास सुरुवात होते. दहा मिनिटांमध्ये हा स्प्रे 99.9 टक्के सूक्ष्म रोगजंतू नष्ट करतो. घरातील सोफे, खुर्च्या, मेट्रो, बस, रेल्वे, विमानतळ आदी अनेक ठिकाणी त्याचा वापर होऊ शकेल.

Back to top button