डिप्रेशनचा परिणाम किडनीच्याही आरोग्यावर ! | पुढारी

डिप्रेशनचा परिणाम किडनीच्याही आरोग्यावर !

बीजिंग : डिप्रेशन म्हणजेच औदासिन्य या मानसिक समस्येचा परिणाम किडनीच्या (मूत्रपिंड) आरोग्यावरही होतो असे संशोधकांनी म्हटले आहे. डिप्रेशनशी झुंजत असलेल्या तरुण लोकांवर याबाबत संशोधन करण्यात आले. चीनच्या सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचा दावा केला आहे. 

डिप्रेशनचाही किडनीच्या घटत्या कार्यक्षमतेशी संबंध असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. हे ‘कनेक्शन’ समजून घेण्यासाठी संशोधकांनी 4,763 लोकांची पाहणी केली. त्यामध्ये सहभागी झालेले 39 टक्के लोक सुरुवातीपासूनच डिप्रेशनशी झुंजत होते. पाहणीच्या दरम्यान पुढील चार वर्षे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रिपोर्टमधून समोर आले की त्यापैकी सहा टक्के लोकांच्या किडनीची काम करण्याची क्षमता वेगाने घटलेली आहे. संशोधक डॉ. किन यांनी सांगितले की क्रॉनिक किडनी डिसीज हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी होण्याच्या धोक्याला वाढवतात. त्यामुळे किडनीचे आरोग्य बिघडण्यामागील कारणे समजून घेणे गरजेचे आहे. ‘द लान्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार भारतात 2017 पर्यंत 19.73 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक विकाराशी झगडत होते. हा आकडा एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के इतका आहे. याचा अर्थ दर सातपैकी एक भारतीय मानसिकद‍ृष्ट्या आजारी आहे. त्यामध्येही 4.67 कोटी लोक डिप्रेशनचे आणि 4.49 कोटी लोक एंजायटीचे शिकार आहेत.

Back to top button