वॉशिंग्टन ः सध्याचे आधुनिक तंत्रज्ञानही लोकांचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडत आहेत. अमेरिकेतील 78 वर्षांच्या एका गृहस्थाचा जीव आता एका स्मार्टवॉचमुळे वाचला आहे. माईक यागर नावाचे हे गृहस्थ पाय घसरून पडल्यावर या स्मार्टवॉचमुळे त्याची माहिती आपत्कालीन सेवा विभागाला समजली व तेथील लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले!
माईक हे घसरून पडले त्यावेळी त्यांच्या जवळपास कुणीही जवळची व्यक्ती नव्हती. त्यामुळे कुणाला मदतीला बोलवायचे हा त्यांना प्रश्न पडला होता. ज्यावेळी आपत्कालीन विभागाचे लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटले. माईक यांनी सांगितले की ज्यावेळी काही लोक मला वाचवण्यासाठी आले त्यावेळी सर्वात आधी मी त्यांना हेच विचारले की त्यांना कसे समजले? त्यांनी सांगितले की माझ्या स्मार्टवॉचने त्यांना संदेश पाठवला होता. माईक यांचे नाक ते पडल्यावर तुटले होते व स्मार्टवॉचला त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यामुळे या वॉचने ऑटोमॅटिकली आपत्कालीन क्रमांकावर फोन केला. आपले हे घड्याळ आपत्कालीन संदेशही पाठवू शकते याची खुद्द माईक यांनाच कल्पना नव्हती. मात्र, हे घड्याळच आपल्यासाठी 'लाईफ सेव्हिंग' ठरले आहे याची आता त्यांना जाणीव झाली आहे.