कोरोनावर तोंडावाटे घेण्याचे नवे औषध | पुढारी

कोरोनावर तोंडावाटे घेण्याचे नवे औषध

वॉशिंग्टन : कोरोना महामारी सुरू झाली त्यावेळेपासूनच या विषाणूचा नायनाट करण्यासाठी तसेच त्यापासून होणार्‍या ‘कोव्हिड-19’वरील उपचारासाठी वेगवेगळी औषधे विकसित केली जात आहेत. आता संशोधकांनी कोरोनावर तोंडावाटे घेण्याचे एक औषध विकसित केले आहे. ‘सायन्स ट्रान्सलेशन मेडिसिन’ नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार प्राण्यांवर या औषधाच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या ओरल व्हॅक्सिनने म्हणजेच तोंडावाटे घेण्याच्या लसीने आजाराची तीव्रता कमी करण्यात यश मिळवले. तसेच कोरोनाचा फैलाव होण्याचा धोकाही या औषधामुळे कमी झाला.

ड्यूक विद्यापीठाच्या संशोधिका स्टेफनी एन लँगेल यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका टीमने याबाबतचे संशोधन केले. त्यांनी एका हॅम्सटरच्या शरीरात ‘सार्स-कोव्ह-2’ या कोरोना विषाणूला सोडले तसेच ही लसही सोडली. या लसीमुळे त्याच्या रक्तात व फुफ्फुसात एक मजबूत अँटिबॉडी प्रतिक्रिया दिसून आली. स्टेफनी यांनी सांगितले की जगभरात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडत असल्याचे दिसून आले आहे. लहान मुलांमध्ये तर प्रतिकारकशक्ती खरोखरच कमी आहे.

एखादी लस घेतलेली व्यक्ती विषाणू संक्रमणाने स्वतः जरी आजारी पडत नसली तरी अन्य लोकांमध्ये या विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता असते. त्यामुळे विषाणूपासून स्वतःलाही सुरक्षित ठेवणारी तसेच त्याचा फैलाव होऊ न देणारी लस गरजेची आहे. अशा लसीमुळे ज्या लोकांनी लस टोचून घेतलेली नाही ते सुरक्षित राहू शकतील.

Back to top button