1,800 Year Old Roman Shield
अठराशे वर्षांपूर्वीची रंगीबेरंगी रोमन ढालPudhari File Photo

अठराशे वर्षांपूर्वीची रंगीबेरंगी रोमन ढाल

सीयासीरियाच्या डुरा-युरोपोस येथे लागला शोध
Published on

लंडन : सध्या गृहयुद्धाने जर्जर झालेल्या सीरियामध्ये शतकभरापूर्वी एक महत्त्वाचे संशोधन झाले होते. सीरियाच्या डुरा-युरोपोस येथे रंगवलेल्या प्राचीन रोमन ढालीचा शोध लागला. उभ्या, दंडगोलाकार आकाराची ही ढाल लाकूड आणि कातड्यापासून बनवलेली आहे. एका रोमन सैनिकाने युद्धावेळी या ढालीचा वापर केला होता. या ढालीवर चित्रेही रंगवलेली आहेत. त्या काळातील पूर्णपणे सुस्थितीत असलेल्या ज्या मोजक्या वस्तू सापडल्या आहेत, त्यामध्ये या ढालीचा समावेश होतो. ही ढाल इसवी सन 250 च्या काळातील आहे.

ही उंच ढाल सध्या येल युनिव्हर्सिटी आर्ट गॅलरीत ठेवण्यात आली आहे. इसवी सनपूर्व चौथ्या शतकापासून इसवी सनाच्या तिसर्‍या शतकापर्यंतच्या काळात अशी रोमन ढाल लोकप्रिय होती. युद्धात कदाचित मृत्युमुखी पडलेल्या एका सैनिकाची ही ढाल असल्याचे मानले जाते. ही ढाल एक उत्तम कलाकृतीही आहे हे विशेष. या ढालीने पुरातत्त्व संशोधकांना त्या काळातील शस्त्रांची तसेच ही ढाल कशा पद्धतीने बनवली जात होती याचा अभ्यास करण्याची संधी दिली. लाकडाच्या अनेक पट्ट्या एकमेकींना जोडून ही उंच ढाल बनवली जात असे. तिची उंची 41.5 इंच आहे. तसेच तिची रुंदी 16 इंच व जाडी 0.2 इंच आहे. ढालीच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार पोकळीत मूठ असे. या मुठीवर आवरण म्हणून वाडग्याच्या आकाराचे संरक्षणात्मक ‘उम्बो’ लावले जाई. मात्र या ढालीवरील असे ‘उम्बो’ गायब आहे. ढालीचा पृष्ठभाग कातडीने आच्छादून तो रंगवला जाई. त्यावर विजयाची चिन्हे चितारली जात असत. गरुड, सिंह यासारखे पशुपक्षी, विजयाची देवता यांची चित्रे त्यावर रंगवली जात असत. सन 1933 मध्ये या ढालीचा डुरा-युरोपोसमधील एका टॉवरखाली झालेल्या उत्खननात शोध लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news