17th Century Shipwreck Gold Coins | ४०० सोन्याच्या नाण्यांसह बुडालेल्या १७ व्या शतकातील जहाजाचे गूढ उकलले

17th Century Shipwreck Gold Coins |
17th Century Shipwreck Gold Coins | ४०० सोन्याच्या नाण्यांसह बुडालेल्या १७ व्या शतकातील जहाजाचे गूढ उकलले
Published on
Updated on

लंडन : इंग्लंडच्या दक्षिण किनारपट्टीवर तब्बल तीन दशकांपूर्वी सापडलेल्या एका रहस्यमयी जहाजाच्या अवशेषांची ओळख पटवण्यात अखेर पुरातत्त्व शास्त्रज्ञांना यश आले आहे. सुमारे ३० वर्षांच्या अथक संशोधनानंतर, हे जहाज १६३३ मध्ये समुद्रात बुडालेले ‘डॉम व्हॅन कुलेन’ नावाचे डच व्यापारी जहाज असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जहाजातून मोरक्कोची हजारो सोन्याची नाणी आणि मौल्यवान वस्तू वाहून नेल्या जात होत्या.

१९९५ मध्ये लागला होता शोध

डेव्हॉनमधील साल्कोम्बेजवळ समुद्राच्या तळाशी १९९५ मध्ये काही डायव्हर्सना (पाणबुड्यांना) या जहाजाचे अवशेष सापडले होते. त्यावेळी समुद्राच्या तळाातून ४०० हून अधिक सोन्याची नाणी आणि दागिने जप्त करण्यात आले होते. मात्र, हे जहाज नेमके कोणते होते आणि कुठून कुठे जात होते, याचे गूढ कायम होते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका ऐतिहासिक पुस्तकात या गुढ्यावरून पडदा उठवण्यात आला आहे.

कसा झाला अपघात?

इतिहासकार इयान फ्रिएल यांनी ‘नॅशनल आर्काइव्हज’मधील जुन्या नोंदींचा अभ्यास करून शोधून काढले की, १६३३ च्या शरद ऋतूत हे जहाज मोरक्कोमधून माल भरून नेदरलँडकडे निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान उत्तर समुद्रात आलेल्या भयानक वादळामुळे जहाजाला मोठे छिद्र पडले आणि ते इंग्लंडच्या किनारपट्टीजवळ बुडाले. सुदैवाने, या अपघातात जहाजावरील सर्व खलाशी सुखरूप वाचले होते.

जहाजावर काय होते?

ऐतिहासिक नोंदीनुसार, या जहाजावर १५० गोण्या डिंक, ६४ गोण्या सोरा (साल्‍टपेपर-दारूगोळ्यासाठी वापरला जाणारा पदार्थ), ३२० शेळ्यांची कातडी आणि तब्बल ९,००० 'बार्बरी डुकाट्स' (मोरक्कोमध्ये तयार झालेली सोन्याची नाणी) होती.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पुरावा

या जहाजावरील सोन्याची नाणी, दागिने, मातीची भांडी आणि इतर वस्तू सध्या ‘ब्रिटिश म्युझियम’मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. १६ व्या आणि १७ व्या शतकात उत्तर आफ्रिका आणि युरोप दरम्यान असणाऱ्या मजबूत व्यापारी संबंधांचा हा एक जिवंत पुरावा आहे. सध्या हे अपघातस्थळ ब्रिटिश कायद्यांतर्गत सुरक्षित ठेवण्यात आले असून, केवळ परवानाधारक पाणबुड्यांनाच तिथे जाण्याची परवानगी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news