Ancient Tomb Egypt | इजिप्तमध्ये सापडली १,७०० वर्षे जुनी कबर

प्राचीन ग्रीक भाषेतील कविता अन् मृताच्या संरक्षणासाठीचे कोरलेले ‘मंत्र’
Ancient Tomb Egypt |
Ancient Tomb Egypt | इजिप्तमध्ये सापडली १,७०० वर्षे जुनी कबर
Published on: 
Updated on: 

कैरो : इजिप्तमधील पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी १,७०० वर्षे जुनी चूनखडीची एक कबर शोधून काढली आहे. या कबरीवर प्राचीन ग्रीक भाषेत एक दुर्मीळ कविता कोरलेली असून, ती मुलाने आपल्या वडिलांच्या निधनावर व्यक्त केलेल्या शोकाकुल मनःस्थितीचे वर्णन करते.

पिरॅमिडच्या आकाराचे छत असलेली ही कबर चौथ्या शतकातील असून, त्या काळात इजिप्तवर रोमन साम्राज्याचे नियंत्रण होते. ‘दाखला ओॲसिस’ मधील प्राचीन मोथिस (आधुनिक मूत) या शहराच्या जवळ ही शोधमोहीम पार पडली. इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही कबर एका पती-पत्नीसाठी बांधण्यात आली होती. या कबरीवर दगडाचा एक पाट असून त्यावर प्राचीन ग्रीक भाषेत १९ ओळींची कविता कोरलेली आहे. मृत व्यक्तीचे नाव ‘पिसेचटेस’ असे असून ते बहुधा न्यायाधीश असावेत. मात्र, या ठिकाणी मानवी अवशेष सापडल्याचा उल्लेख अहवालात नाही.

या कबरीवर इजिप्तच्या प्राचीन ‘हायड्रोग्लिफिक’ लिपीतील शिलालेखही आहेत, ज्यामध्ये मृताच्या आत्म्याच्या संरक्षणासाठीच्या मंत्रांचा समावेश आहे. काही शिलालेखांमध्ये ‘अमडुआत’मधील भागांचा उल्लेख आहे; हे असे ग्रंथ आहेत जे सूर्यदेवाचा पाताळातील प्रवास सांगतात. याशिवाय, पुरातत्त्व शास्त्रज्ञांना तिथे एक अर्पण टेबल, शुद्धीकरणाचे भांडे, मातीची भांडी आणि रोमन सम्राट ‘कॉन्स्टन्टाईन द ग्रेट’ (किंवा पहिला कॉन्स्टन्टाईन) यांचे चित्र असलेले किमान एक नाणे सापडले आहे. कॉन्स्टन्टाईन यांनी इसवी सन ३०६ ते ३३७ या काळात राज्य केले असून त्यांनी ख्रिश्चन धर्माला मान्यता दिली होती. मात्र, या कबरीमध्ये कोणतेही ख्रिश्चन धर्माचे प्रतीक किंवा मजकूर आढळलेला नाही.

कबरीच्या प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी १४ पायऱ्या असून, प्रवेशद्वारावर पंख असलेली सूर्य चक्ती, ओसिरिस देव आणि दोन नाग यांची चित्रे कोरलेली आहेत. न्यू जर्सी येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी’चे संशोधक अँजेलोस चॅनिओटिस यांच्या मते, कबरीवर कोरलेली कविता ही अत्यंत उच्च साहित्यिक दर्जाची असून तिचे व्याकरण होमरच्या प्रसिद्ध महाकाव्यांसारखे आहे. या छोट्या कवितेमध्ये मृत पिसेचटेस यांच्या दयाळूपणाचे आणि बुद्धिमत्तेचे कौतुक करण्यात आले असून त्यांचा ‘जीवनातील मार्गदर्शक’ असा उल्लेख केला आहे. कवितेच्या शेवटच्या ओळींमध्ये त्यांचा मुलगा सरापिअन आपल्या वडिलांना हाक मारत म्हणतो, ‘ऐका, बाबा!’ आणि आपल्या दुःखी मुलांनी वाहिलेली श्रद्धांजली व अर्पण केलेल्या वस्तू स्वीकारण्याची विनंती करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news