Ancient Helmet mask | 1700 वर्षांपूर्वीचे मुखवट्यासह हेल्मेट

Ancient Helmet mask |
Ancient Helmet mask | 1700 वर्षांपूर्वीचे मुखवट्यासह हेल्मेट
Published on
Updated on

लंडन : इसवी सन 1796 मध्ये इंग्लंडमधील रिबचेस्टर येथे एका लहान मुलाला घरामागील शेतात खेळताना धातूच्या 30 हून अधिक वस्तूंचा खजिना सापडला. या शोधामुळे रोमन साम्राज्यातील एका अत्यंत दुर्मीळ आणि कलाकुसर असलेल्या ‘कांस्य हेल्मेट’चा उलगडा झाला, जे आज ‘रिबचेस्टर हेल्मेट’ म्हणून जगप्रसिद्ध आहे.

1813 पासून ब्रिटिश म्युझियममध्ये जतन करून ठेवलेले हे हेल्मेट दोन प्रमुख भागांनी बनलेले आहे : 1. शिरस्राण : ज्यावर युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. 2. चेहरा मुखवटा : जो एका तरुण मुलाच्या चेहर्‍यासारखा दिसतो. सुमारे 1.3 किलोग्रॅम वजनाचे हे हेल्मेट रोमन काळातील ब्रिटनमध्ये सापडलेल्या अशा प्रकारच्या केवळ तीन मुखवटाधारी हेल्मेटस्पैकी एक आहे. या हेल्मेटवर सहा अश्वदळ सैनिक आणि 11 पायदळ सैनिकांमधील युद्धाचे दृश्य कोरलेले आहे. यावर विजयाचे प्रतीक असलेली ‘पामेटस्’ची चिन्हे आणि शत्रूकडून जिंकलेली शस्त्रेही दर्शवण्यात आली आहेत. मुखवट्यावरील तरुणाचे केस सापांच्या चार डोक्यांसारखे दिसतात, जे ‘मेड्युसा’ या पौराणिक पात्राचा संदर्भ देतात.

केसांवर शहराच्या भिंतीसारखा आकार असलेला ‘कोरोना मुरॅलिस’ नावाचा मुकुट आहे, जो रोमन सैन्यातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जात असे. हे हेल्मेट प्रत्यक्ष युद्धासाठी वापरणे अशक्य होते; कारण त्यातील डोळ्यांची आणि नाकाची छिद्रे अत्यंत लहान होती. 2019 मधील एका संशोधनानुसार, पुरातत्वशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की हे हेल्मेट ‘हिप्पिका जिम्नेशिया’ म्हणजेच अश्वदळाच्या स्पर्धांसाठी वापरले जात असे. हे एक प्रकारचे लष्करी सराव आणि करमणुकीचे कार्यक्रम असत, जिथे सैनिक ग्रीक किंवा अ‍ॅमेझॉन्सच्या वेशभूषेत आपली युद्धकला सादर करत. हे हेल्मेट कदाचित ‘ब्रेमेटेनाकम वेटरनोरम’ या रोमन किल्ल्याजवळ एका पेटीत साठवून ठेवले असावे. दुसर्‍या शतकाच्या शेवटी जेव्हा हा किल्ला ओस पडला, तेव्हा हा खजिना तिथेच गाडला गेला. तब्बल 17 शतकांनंतर एका लहान मुलाच्या शोधामुळे हा ऐतिहासिक वारसा पुन्हा जगासमोर आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news