

मॉस्को : रशियातील एका ज्वालामुखीने आपला ‘राक्षसी’ अवतार दाखवलेला असून, त्याने वातावरणात तब्बल 1,600 किलोमीटर लांब धुराची नदी सोडली होती. ‘नासा’च्या उपग्रहाने टिपलेले हे भयानक छायाचित्र सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. हे द़ृश्य पॅसिफिक महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’मध्ये दडलेल्या ज्वालामुखीच्या प्रचंड शक्तीची आठवण करून देणारे आहे. या 2023 मध्ये कॅमेर्यात टिपलेल्या ज्वालामुखीच्या लाव्हा उद्रेकाचे दोन भाग राक्षसाच्या शिंगांसारखे दिसत आहेत! हे छायाचित्र आता कृत्रिमरीत्या रंगीत करून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हा ज्वालामुखी रशियाच्या दूरवरच्या कामचटका द्वीपकल्पावर वसलेला असून, त्याचे नाव ‘क्ल्युचेव्स्कॉय’ आहे. हा एक सक्रिय ज्वालामुखी असून, त्याची उंची तब्बल 15,597 फूट आहे. या उंचीमुळे तो केवळ रशियाच नव्हे, तर संपूर्ण आशिया आणि युरोप खंडांतील सर्वात उंच ज्वालामुखी ठरला आहे. कामचटका द्वीपकल्प हा ज्वालामुखींचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, जिथे 300 हून अधिक लहान-मोठे ज्वालामुखी आहेत. नासाच्या ‘अॅक्वा’ या उपग्रहाने हे छायाचित्र 2023 मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान टिपले होते. हा उद्रेक अत्यंत तीव— होता, ज्यामुळे ज्वालामुखीच्या मुखातून दोन बाजूंनी लाव्हारसाचे प्रवाह बाहेर पडले, जे एखाद्या राक्षसाच्या शिंगांसारखे दिसत होते. यासोबतच धूर, राख आणि विषारी वायूंचा एक प्रचंड लोट थेट वातावरणात 12 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचला. हा धुराचा लोट पॅसिफिक महासागरात 1,600 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत पसरला होता, ज्यामुळे परिसरातील हवाई वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबवावी लागली होती. ‘नासा’ने प्रसिद्ध केलेले हे छायाचित्र ‘फॉल्स कलर’ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले आहे. म्हणजेच, ते नैसर्गिक रंगात नाही. ज्वालामुखीचा लाव्हारस स्पष्टपणे दिसावा, यासाठी ‘इन्फ्रारेड’ किरणांचा वापर करून त्याला नारंगी रंग देण्यात आला आहे, तर ज्वालामुखीच्या धुरापासून आजूबाजूच्या ढगांना वेगळे दाखवण्यासाठी त्यांना निळसर रंग दिला आहे.