16 Year Old Entrepreneur | सोळा वर्षांचा उद्योजक मुलगा वडिलांना देतो २ लाखांचा पगार!

 16 Year Old Entrepreneur |
16 Year Old Entrepreneur | सोळा वर्षांचा उद्योजक मुलगा वडिलांना देतो २ लाखांचा पगार!
Published on
Updated on

तिरुवनंतपूरम : आजच्या काळात जिथे सोळा-सतरा वर्षांची मुले १० वी, १२ वीच्या परीक्षांच्या तयारीत गुंतलेली असतात आणि पॉकेटमनीसाठी पालकांवर अवलंबून असतात, तिथे केरळममधील एका मुलाने संपूर्ण जगाला अवाक्‌ केले आहे. कोचीचा रहिवासी असलेला राऊल जॉन अजूच आज जगभरात ‘एआय किड ऑफ इंडिया’ या नावाने ओळखला जातो. अवघ्या १६ वर्षांच्या वयात १२ वी कॉमर्सचे शिक्षण घेत राऊल स्वतःची एआय कंपनी चालवत आहे. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, राऊलने स्वतःच्या वडिलांनाच आपल्या कंपनीत कामावर ठेवले असून तो त्यांना दरमहा २ लाख रुपये पगार देतो!

केरळममधील कोची येथील नॉर्थ एडप्पल्ली GHSS शाळेत १२ वी कॉमर्समध्ये शिकणारा राऊल जॉन अजूच आज देशातील सर्वात चर्चित टीनेजर्सपैकी एक बनला आहे. अत्यंत लहान वयात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (एआय) ताकद ओळखणाऱ्या राऊलने ही तंत्रज्ञानाची संकल्पना फक्त शिकलीच नाही, तर तिचे रूपांतर एका यशस्वी व्यवसाय मॉडेलमध्ये केले. आज तो त्याच्या ‘एआय टेक्नॉलॉजीज’ या कंपनीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे.

राऊलचे तंत्रज्ञानावरील प्रेम वयाच्या नवव्या वर्षी व्हिडीओ एडिटिंगपासून सुरू झाले. त्याचे वडील ॲडोब कंपनीत काम करत असताना, राऊलला प्रीमियम सॉफ्टवेअर टूल्सचा विनामूल्य वापर करण्याची संधी मिळाली. याच काळात त्याने स्वतःहून ‘एआय’ शिकण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या शाळेच्या सायन्स प्रोजेक्टसाठी ‘MeBot’ नावाचा रोबो तयार केला होता, जिथून त्याच्या या प्रवासाची खरी सुरुवात झाली. ज्या वयात मुले पालकांकडे पैशांची मागणी करतात, त्या वयात राऊल आपल्या वडिलांना दरमहा २ लाख रुपयांचा पगार देतो. त्याचे वडील यापूर्वी ॲमेझॉन, ॲडोब, विप्रो आणि आयबीएमसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम करीत होते.

राऊलचे म्हणणे आहे की, ‘मी फोनवरून ज्ञान मिळवू शकतो; पण वडिलांचा वर्षांचा अनुभव विकत घेऊ शकत नाही.’ म्हणूनच त्याने आपल्या वडिलांना कंपनीत समाविष्ट केले, ज्याचा त्याच्या व्यवसायाला आणि मार्केटिंगला मोठा फायदा झाला. राऊलच्या ‘एआय टेक्नॉलॉजीज’ या कंपनीत आज १५ कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून रिमोटली (घरातून) काम करतात. छोट्या प्रमाणावर सुरू झालेली ही संकल्पना आज एका आंतरराष्ट्रीय स्टार्टअपमध्ये रूपांतरित झाली असून ती अनेक मोठ्या प्रोजेक्‍टस्‌वर काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news