अंतराळ स्थानकाकडे प्रथमच खासगी चार प्रवासी होणार रवाना | पुढारी

अंतराळ स्थानकाकडे प्रथमच खासगी चार प्रवासी होणार रवाना

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ह्युस्टनस्थित ‘एक्सिओम स्पेस’ ही खासगी कंपनी आपल्या चार अंतराळ प्रवाशांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविणार आहे. हे चारही अंतराळ प्रवासी अ‍ॅलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या कंपनीच्या ‘ड्रॅगन कॅप्सूल’मधून बुधवारी, 6 एप्रिल रोजी अंतराळ स्थानकाकडे रवाना होतील. ‘एएक्स-1’ असे या मिशनचे नाव आहे.

‘एक्सिओम स्पेस’च्या या मिशनमध्ये नासाचे माजी अस्ट्रोनॉट माईकल लोपेज एलेग्रिया यांचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय तीन खासगी प्रवाशांमध्ये लॅरी कॉर्नर, माई पॅथी आणि इटन स्ट्रीब यांचा समावेश आहे. चौघांची ही अंतराळ यात्रा 10 दिवसांची असेल. यामध्ये ते आठ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहतील, तर दोन दिवस येण्या-जाण्यासाठी लागतील. दहा दिवसांच्या कालावधीत ‘25 मायक्रोग्रॅव्हिटी एक्सपेरिमेंट्स’ होतील. ते सायन्स, एज्युकेशन आणि आऊटरिचशी संबंधित असतील.

आपल्या अंतराळ प्रवासाबाबत मायकेल लोपेज एलेग्रिया यांनी सांगितले की, अशा अंतराळ मोहिमांच्या माध्यमांतून स्पेस ट्रॅव्हलला मोठी चालना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आता केवळ वर्किंग, लिव्हिंग आणि रिसर्चसाठी शास्त्रज्ञच असणार नाहीत, तर अन्य खासगी लोकही त्याचा अनुभव घेऊ शकतील. या मिशनसाठी आम्ही चारही अंतराळ प्रवाशांनी अनेक तास एकत्रपणे

सिम्युलेशनमध्ये काम केले आहे. एकत्र ट्रेनिंग घेतले आहे; जेणेकरून अंतराळ यात्रेदरम्यान एकमेकांत सामंजस्य निर्माण होईल. आमचे ट्रेनिंग पूर्ण झाले असून, आम्ही आता अंतराळ स्थानकावर जाण्यास सज्ज झालो आहोत.

Back to top button