वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहावर भू-चुंबकीय वादळे होत नाहीत. ही विशेषता फक्त पृथ्वीवरच पाहावयास मिळते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय शास्ञज्ञांच्या एका पथकाने नुकतेच सिद्ध केले की, चुंबकीय वादळे केवळ पृथ्वीवरच नव्हे तर ती 'बुध' या ग्रहावरही होत असतात. बुधावरील या चुंबकीय वादळांना पृथ्वीप्रमाणे आवेशित कणांचे वलय प्रवाहच जबाबदार आहे.
पृथ्वी आपल्या सूर्यमालेतील एक अनोखा ग्रह आहे. पृथ्वीची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत की, ती दुसर्या ग्रहांवर आढळत नाहीत. यामुळे अंतराळ शास्त्रज्ञ सातत्याने पृथ्वीसारखा ग्रह शोधण्याचा प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ शास्त्रज्ञांच्या एका पथकाने आपल्या संशोधनातून सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुधावरही चुंबकीय वादळे येतात, असा निष्कर्ष काढला. यापूर्वी अशी वादळे केवळ पृथ्वीवरच येतात, असे समजले जात होते. मात्र, नव्या शोधामुळे ही धारणा आता बदलली.
या आंतरराष्ट्रीय पथकात अमेरिका, कॅनडा आणि चीनचे शास्त्रज्ञ सहभागी होते. बुधासंबंधीचे हे महत्त्वपूर्ण संशोधन अलास्का फेअरबँक्स जिओफिजिकल इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीचे खगोल शास्त्रज्ञ प्रो. हुई जांग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
संशोधकांच्या या पथकाने दुसर्या ग्रहांवरही भू-चुंबकीय वादळे येतात का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाच्या माध्यमातून पृथ्वीसारखी चुंबकीय वादळे बुध या सूर्यमालेतील लहान ग्रहांवरही येतात, असे निष्पन्न झाले. या संशोधनाचे निष्कर्ष गेल्या महिन्यात एका शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले.